क्रिकेटच्या मैदानातून स्वप्नांना भरारी; दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी!
महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागातील गुणवंत क्रिकेटपटूंना हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या खेळातील कौशल्याला योग्य संधी मिळावी आणि खेळाच्या माध्यमातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं, या उद्देशाने ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग’च्या पहिल्या पर्वाची आज पत्रकार परिषदेत घोषणा केली.या स्पर्धेसाठी राज्यभरातून आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य कुटुंबांतील, विशेषतः शेतकरी कुटुंबांतील सुमारे १५०० ते १६०० होतकरू खेळाडूंचा शोध घेण्यात आला आहे. ‘गल्लीपासून स्टेडियमपर्यंत’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून गावागावांतील क्रिकेटपटूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस आहे.विशेष म्हणजे, या स्पर्धेला सामाजिक बांधिलकीचीही जोड देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन स्पर्धेच्या माध्यमातून उभारला जाणारा निधी दुष्काळग्रस्त भागातील शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा संकल्प आहे.
केवळ क्रिकेटपटूच नव्हे, तर पंच, प्रशिक्षक आणि क्रीडासाहित्याशी संबंधित व्यावसायिकांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच टेनिस क्रिकेटला अधिकृत क्रीडा मान्यता मिळावी आणि या खेळातील गुणवंत खेळाडूंना भविष्यात शासकीय नोकरीच्या संधींचाही लाभ मिळावा, यासाठी पाठपुरावा करण्याचा मानस व्यक्त केला.इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनशी संलग्न असलेल्या या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील खेळाडूंना अनुभवी क्रिकेटपटूंचं मार्गदर्शन मिळवून देण्यासाठीही प्रयत्नशील आहोत. स्पर्धेचे नियम, संघरचना आणि पुढील कार्यक्रम लवकरच जाहीर करण्यात येतील.खेळ म्हणजे केवळ मैदानावरील विजय नव्हे, तर एखाद्या होतकरू तरुणाचं आयुष्य घडवण्याची संधी आहे. गावच्या मातीत खेळणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाला मोठ्या स्टेडियमवर स्वतःची ओळख निर्माण करता यावी आणि त्याच्या कर्तृत्वातून कुटुंबाला आर्थिक आधार मिळावा, हेच या स्पर्धेमागील आमचं स्वप्न आहे!
या पत्रकार परिषदेस श्री. भूपेंद्र सिन्हा, श्री. ब्रिजेश सोळकर, श्री. भरत लोहार, श्री. दीपक पवार, श्री. प्रवीण गंगेरी यांच्यासह महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Facebook : https://www.facebook.com/share/p/1KBRUih5DC/
Instagram : https://www.instagram.com/p/DfSZAxGD78D/?utm_source=ig_web_button_share_sheet&srtk=MzRlODBiNWFlZA==
X : https://x.com/samant_uday/status/2117666562329264304?a=t2LcwBXnG9Pgg3d-OrQ&s=20
Youtube : https://youtube.com/post/UgkxoTzf1skuDPm5lleCPmGsbM4DKV5L7mf5?si=PQInSV52hddqQZjp






















