* मुंबई,
*सुमनताई या अतीशय हळव्या मनाच्या, निरागस, निगर्वी, प्रामाणिक, सुसंस्कारी, घरंदाज होत्या. त्यांचे ना लतादीदीं बरोबर वाद होते की ना आशाताई बरोबर संघर्ष होता. उलटपक्षी लतादीदी, आशाताई यांच्या सह सर्वांनीच सुमनताईंचे कौतुकच केले आहे, त्यांच्याबद्दल आलेल्या बातम्या या कपोलकल्पित, गैरसमज पसरविणाऱ्या होत्या. प्रत्यक्षात त्या खूपच वेगळ्या होत्या. त्यांचे पाय सदैव जमिनीवरच होते, अशा शब्दांत प्रख्यात सुसंवादिनी आणि सुमन कल्याणपूर यांच्या जीवनावर आधारित सुमन सुगंध या पुस्तकाच्या लेखिका मंगलाताई खाडिलकर यांनी सुमन कल्याणपूर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव केला. बोरीवली पश्चिम येथील कै प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात कला प्रतिष्ठान आयोजित ज्येष्ठ पार्श्वगायिका, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांना सुरेल मानवंदना देण्यासाठी ‘सुमन सुगंध’ या कार्यक्रमाचे विजय तारी, संजय देसाई, श्रीकृष्ण कुलकर्णी, प्रफुल्ल कारेकर यांनी आयोजन केले होते. भारतीय जीवन विमा निगम, गिरगांव कट्टा, स्मृतिगंध, महाराष्ट्र टाइम्स चा कल्चरल क्लब यांनी हा सुरेल सांगितिक कार्यक्रम प्रायोजित केला होता. मंगलाताई खाडिलकर यांच्या सुमन कल्याणपूर यांच्या संदर्भातील केलेल्या गुणगौरवाने कै प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिराच्या सभागृहातील अवघे रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. लतादीदी आणि शंकर जयकिशन, लतादीदी आणि मोहम्मद रफी यांच्यात वाद निर्माण झाला म्हणून सुमनताई यांनी शंकर जयकिशन आणि मोहम्मद रफी यांच्या समवेत गाणी गायली या बातम्या अत्यंत चुकीच्या होत्या, गैरसमज पसरविणाऱ्या होत्या. मुळात असे काहीही घडलेले नाही. या सर्वांचे एकमेकांशी अतीशय मधुर संबंध होते, अशीही स्पष्टोक्ती मंगलाताई खाडिलकर यांनी केली. माधुरी करमरकर, मंदार आपटे आणि विद्या करलगीकर यांनी अतीशय मेहनतीने, परिश्रमपूर्वक सुमन कल्याणपूर यांची गाणी सादर केली. ती पाहिली, ऐकली आणि मगच त्या आमच्या या सांगितिक कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहू लागल्या, अशीही आठवण मंगलाताई खाडिलकर यांनी सांगितली. सुमन कल्याणपूर यांच्या केतकीच्या बनी तिथे नाचला मोर, निंबोणीच्या झाडामागे, अरे संसार संसार, सांग कधी कळणार तुला, घाल घाल पिंगा वाऱ्या, रिमझिम झरती श्रावणधारा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, जिथे सागरा धरणी मिळते पासून तर आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, ना ना करते प्यार तुमही से कर बैठे, रहे ना रहे हम, तुम से ओ हसीना अशा असंख्य मराठी हिंदी गाण्यांच्या गाण्यांनी माधुरी करमरकर, मंदार आपटे, विद्या करलगीकर यांनी सादर करीत सांगितिक आदरांजली वाहिली आणि या महान गायिकेला अभिवादन केले. सुमनताईंसमवेत कार्यक्रमासाठी आवर्जून साथ देणारे प्रख्यात संगीत संयोजक प्रशांत लळित यांच्या अधिपत्याखाली वादकांनी संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उंचीवर नेला. संगीत संयोजन या कार्यक्रमास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई हे आवर्जून उपस्थित होते. गिरगांव कट्टा चे मालक प्रदीप मालणकर यांच्या शुभहस्ते सुभाष देसाई यांचा तर सुभाष देसाई यांच्या शुभहस्ते मंगलाताई खाडिलकर, श्रीकृष्ण कुलकर्णी, संजय देसाई, विजय तारी तसेच प्रायोजकांना सन्मानित करण्यात आले. धर्मरक्षक संभाजी मालिकेतील हंबीरराव मोहिते यांची भूमिका साकारणारे अनिल गवस, ५०७ वेळा रायगड सर करणारे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई, गुजराती रंगभूमिवरील अभिनेत्री जिग्ना हितांशु वैद्य त्रिवेदी यांच्या सह अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित होते.*
Home मुंबई *सुमनताईंचे कुणाशीही वितुष्ट वा वादविवाद नव्हते ; मंगलाताई खाडिलकर यांनी केला ख्यातनाम...


















