*• माहीम किल्ल्याच्या संवर्धन व पुनरुज्जीवन संदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सीमाशुल्क विभाग यांच्यात सामंजस्य करार*
माहीम किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन होणे म्हणजे ऐतिहासिक सौंदर्य पुनरुज्जीवित करणे होय. बृहन्मुंबई महानगरपालिका या किल्ल्याचे संवर्धन करत आहे, ही गौरव आणि अभिमानाची बाब आहे, अशी भावना महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केली आहे.
राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित असलेल्या माहीम किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन कामासंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिका आणि सीमाशुल्क विभाग यांच्यात शुक्रवार (दि १८ जून २०२६) बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सामंजस्य करार करण्यात आला आहे. त्यावेळी त्या बोलत होत्या.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त अजयकुमार पांडे, सीमाशुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री. नितीन तगाडे, विक्रम फडके, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपआयुक्त (आयुक्त यांचे कार्यालय) प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (परिमंडळ २) श्री. प्रशांत सपकाळे, सहायक आयुक्त (जी उत्तर विभाग) योगेश देसाई, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार विकास दिलावरी, वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेतील संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. के. के. सांगळे आदी यावेळी उपस्थित होते.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात मुंबईतील पुरातन वास्तूंचे संवर्धन आणि जतन केले जाते. याच धर्तीवर, माहीम किल्ल्याचे संवर्धन आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे.
या सामंजस्य करार अंतर्गत, माहीम किल्ल्याच्या जीर्ण झालेल्या संरचनेचे मजबुतीकरण व पुनर्बांधणी करण्यात येईल. किल्ला परिसरातील ऐतिहासिक विहिरीचा शोध व उत्खनन केले जाईल. किल्ल्याच्या आतील परिघाभोवती पादचारी मार्ग विकसित करण्यात येईल. तसेच, किल्ल्याच्या पायाभरणीचे संरक्षण करण्यासाठी संरक्षक तटबंदी बांधण्यात येईल. यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या जी (उत्तर) विभागाकडून माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण निष्कासित करुन तेथे वास्तव्यास असलेल्यांचे पुनर्वसन करण्यात आले. त्यामुळे, आता या किल्ल्यास त्याचे वैभव आणि सौंदर्य प्राप्त करुन देण्यास मदत होईल.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी म्हणाल्या, ऐतिहासिक पुरातन वारसा असलेला माहीम किल्ल्यावरील अतिक्रमण निष्कासित करुन त्याचे संवर्धन करण्यासाठी महानगरपालिकेने खूप प्रयत्न केले आहेत. आता हा किल्ला पर्यटन स्थळाच्या रुपात विकसित करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे.
सीमाशुल्क विभागाचे प्रधान आयुक्त श्री. अजयकुमार पांडे म्हणाले, ऐतिहासिक पुरातन वारसा असण्यासोबतच सीमाशुल्क विभागाचे कस्टम स्टेशन म्हणून माहीम किल्ल्याची ओळख आहे. महानगरपालिकेने हाती घेतलेल्या संवर्धन आणि पुनरुज्जीवनाच्या कामकाजामुळे या किल्ल्यास लौकिक प्राप्त होईल. तसेच, मुंबईकरांसाठी पर्यटनस्थळ म्हणून हा किल्ला विकसित होईल.
माहीम पुरातन किल्ला असून राजा बिंबदेव यांच्या वंशजांनी सुमारे बाराव्या आणि तेराव्या शतकात या किल्ल्याची उभारणी केली. मुंबईच्या सात बेटांपैकी माहीम हे सत्तेचे प्रमुख केंद्र होते आणि हा किल्ला त्या वैभवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. महाराष्ट्र शासनाने १९७५ मध्ये माहीम किल्ल्यास राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. किल्ल्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ३ हजार ७९६.०२ चौरस मीटर आहे. सध्या हा किल्ला सीमाशुल्क विभागाच्या अखत्यारित आहे. माहीम किल्ल्याच्या विद्यमान संरचनेवर झोपडपट्टी स्वरूपातील अतिक्रमणे झाली होती. या संपूर्ण क्षेत्राचे सर्वेक्षण करून वैध कागदपत्रांची पडताळणी करुन २७५ झोपडीधारकांचे पुनर्वसन कुर्ला व मालाड येथील प्रकल्पग्रस्तांसाठी उपलब्ध सदनिकांमध्ये करण्यात आले आहे. तथापि, येथील एका धार्मिक संरचनेच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जी (उत्तर) विभाग कार्यालय, सीमाशुल्क विभाग, पुरातन वारसा संवर्धन सल्लागार मेसर्स विकास दिलावरी आणि वीरमाता जिजाबाई तंत्रज्ञान संस्थेचे संरचनात्मक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. के. के. सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्याच्या पुनर्स्थापना व संवर्धनाचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव आहे.
***


















