Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *रविंद्र रानडे : बहुरंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड ! -योगेश वसंत त्रिवेदी

*रविंद्र रानडे : बहुरंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड ! -योगेश वसंत त्रिवेदी

31
0

“अहो, योगेशजी, ११ ऑक्टोबर ला तुम्हाला यायचंय बरं कां प्रबोधनकार ठाकरे नाट्य मंदिरात. आमचं खास कोकणावरचं नाटक आहे. तुम्ही अवश्य यायला हवे.” “रानडेसरकार, नक्की येणार. अहो तुमच्या सारख्या नटसम्राटाने बोलावल्यावर नाही कसे येणार.” रविंद्र रानडे आणि मी असा हा संवाद. परंतु अकरा जूनलाच पडदा पडला आणि एक बहुरंगी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले. मागाठाणे मित्र मंडळ संचालित कै प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाच्या मुख्य ग्रंथपाल संजना वारंग यांचा सक्काळीच भ्रमणध्वनीवर आवाज ऐकला,”काका, अहो ऐका नां ? तुम्हाला ते रानडे माहिती आहेत कां ?” म्हटले, “कोणते ?” “अहो, ते नाही कां ? गायक आहेत, आपल्या जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात हमखास येतात ते? एका समाजमाध्यमावर बातमी फिरतेय.” मग मी मीना इंगळे नाईक यांच्या बरोबर संपर्क साधला पण त्यांचा भ्रमणध्वनी व्यस्त होता. मग मी थेट ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यवाह स्मीता चितळे यांना भ्रमणध्वनी केला. त्यांनी सविस्तर माहिती दिली. चारच दिवसांपूर्वी त्यांना मेंदूच्या विकाराचा झटका आला आणि एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. तब्येत सुधारत असतांनाच ११ जून रोजी सकाळी ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे देहावसान झाले. दुपारी बार साडेबारा च्या सुमारास रुग्णसेविकेतून पार्थिव कंट्री पार्कच्या निवासस्थानी आणण्यात आले. सर्वच थरातील प्रतिष्ठित मंडळींनी अंत्यदर्शन घेतले आणि बोरीवली पूर्व येथील दौलतनगर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चिरंजीव निनाद रविंद्र रानडे यांनी हे सोपस्कार पूर्ण केले. २०२१ साली पार्किन्सन या आजारामुळे रविंद्र रानडे यांच्या पत्नी शीतल यांनी जगाचा निरोप घेतला. आज पाच वर्षांनी रविंद्र रानडे यांनी इहलोकीची यात्रा संपविली. सुपूत्र निनाद, सूनबाई सौ. उदिता आणि नातू चैतन्य आता मातृछत्रा पाठोपाठ पितृछत्र हरपल्याने या तिघांच्या हाती केवळ रविंद्र आणि शीतल यांच्या आठवणीवरच पुढचे आयुष्य कंठावे लागणार आहे. रविंद्र रानडे हे अतीशय बहुरंगी व्यक्तिमत्त्व होते. एक मनमौजी, हसतमुख, दिलखुलास, सदाबहार ही सगळी विशेषणं त्यांच्यासमोर थिटी पडतील. जय महाराष्ट्र नगर येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, जय महाराष्ट्र नगराचे भाग्यविधाते विजय वैद्य यांच्या अकरा नंबरच्या इमारतीत सुरुवातीला वास्तव्य असणारे रविंद्र रानडे हे मग आपलं बिऱ्हाड घेऊन कंट्री पार्कच्या इमारतीत वास्तव्यास आले. मी जवळच रहात असल्याने नेहमी गाठीभेटी, गप्पा टप्पा होत रहायच्या. आधी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला बरोबर निकटचे संबंध. मग हळुहळू ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रीय सहभाग. दर बुधवारच्या कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींना चहा नाश्ता आवर्जून प्रत्येकाच्या खुर्ची जवळ नेऊन देणे, गाणी म्हणणे, संजय देशपांडे यांच्या समवेत पसायदानाने कार्यक्रमाचा समारोप करणे, हा त्यांचा परिपाठ होता. संगीत संयोजक नीलेश माळी यांच्या स्वर हार्मनी वाद्यवृंदाचे ते खंदे गायक. मग या वाद्यवृंदाचा कार्यक्रम कुठेही असो, मग तो प्रबोधनकार ठाकरे नाट्यमंदिरात किंवा कोठेही असो यांच्या गीत गायनाने उपस्थित रसिक श्रोत्यांचे पाय थिरकल्याशिवाय रहाणारच नाहीत. गोड गळ्याची ही दैवी देणगी मिळालेली मंडळी मग त्यात मीना इंगळे नाईक असू द्या, दिनेश विचारे असू द्या, संजय कानडे असोत विजय घरटकर असोत की करण मेननच्या मातोश्री असोत, सगळे काही लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, किशोर कुमार होऊ शकत नसले तरी त्यांच्या पेक्षा यांचा गोड गळा काही कमी नाही. या स्वर हार्मनी वाद्यवृंदाचे रविंद्र रानडे हे उत्तम गायक होते. खंदे आधारस्तंभ होते. बरं, इतक्यावरच रविंद्र रानडे थांबले नाहीत तर त्यांनी कोकणी माणसाच्या जीवनावर आधारित ‘आम्हीच कोकणचे राजे’ हे नाटकही रंगमंचावर आणले. त्याच्या भरपूर तालमी व्हायच्या आणि मग प्रयोग. त्यांचे सहकारी पोयरेकर आणि अन्य असेच येता येता भेटले. मग चहा नाश्ता भरपूर गप्पा हे ओघाने आलेच. ना थकता, ना दमता रविंद्र रानडे सदोदित हसत खेळत आपले जीवन खऱ्या अर्थाने जगत होते. संसारातला एक खांदा निखळला पण चेहऱ्यावर कोणतीही निराशेची एकही सुरकुती दिसणार नाही, अशा पद्धतीने ते वावरायचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत की माशाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत. अगदी तश्शाच पद्धतीने त्यांनी आपले जीवन जगणे सुरु ठेवले होते. रविंद्र रानडे यांचे लिखाण एखाद्या साहित्यिकापेक्षा कमी नाही. त्यांचे विचार, वैचारिक बैठक पक्की असल्याने त्याचा प्रत्यय त्यांच्या लिखाणात दिसून येतो. हल्ली एक बरं आहे की समाजमाध्यमाचा वापर होतो आणि त्याद्वारे आपल्याला चांगल्या गोष्टी पहायला, वाचायला मिळतात. चेहऱ्याचे पुस्तक म्हणजे फेसबुकवर आपण मैत्री केली की आपल्याला समोरच्या व्यक्तीच्या, मित्राच्या, भगिनींच्या वैचारिक बाबी पहायला, वाचायला मिळतात. असेच मी रविंद्र रानडे यांच्या फेसबुकवर पहायला गेलो तेंव्हा त्यांनी वहिच्या पानावर लिहिलेल्या वैचारिक लिखाणाची छायाचित्रे पहायला मिळाली. जीवन म्हणजे काय ? जन्म आणि मृत्यू या गोष्टी आपल्या हाती नसतात पण जन्मापासून मृत्यूपर्यंत जो प्रवास आहे तो कसा करायचा हे आपल्या हातात निश्चितच आहे, हेच खरे जीवन आहे. हे एक वहिचे त्यांनी लिहिलेले पान पाहिले तेंव्हा या बहुरंगी व्यक्तिमत्वाची ओळख आपल्याला पटल्याशिवाय राहत नाही. रविंद्र रानडे यांच्या संदर्भात लिहायला गेलो तर फार मोठी कादंबरी होऊ शकेल परंतु या ठिकाणी लेखनसीमा पाळावीच लागेल. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा आणि हसतमुख व्यक्तिमत्व अशा आदरणीय रुचिराताई दिघे यांच्या आकस्मिक निधनाला जेमतेम एक महिना होतोय ना होतोय तोच बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेल्या रविंद्र रानडे यांचे झालेले अकस्मात देहावसान मनाला जबरदस्त धक्का देणारे आहे. रविंद्र रानडे यांच्या निधनामुळे बोरीवली पूर्व येथील विविध संस्थांमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे ती भरुन निघणे निव्वळ अशक्य आहे. नाटकाच्या रंगमंचावर तुफानी वावर करणाऱ्या या बहुरंगी बहुढंगी नटश्रेष्ठाने अचानक घेतलेली ‘एक्झिट’ न पचणारी, न परवडणारी असली तरी वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. ईश्वरेच्छा बलियसी. या नटश्रेष्ठ बहुरंगी व्यक्तिमत्त्व असलेल्या रविंद्र रानडे यांच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा ! रानडे परिवाराला हे डोंगराएवढे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि स्वर्गीय रविंद्र रानडे यांच्या आत्म्यास शांती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !!
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत).*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here