कमलताई गवई यांच्या नावाने फिरणारे पत्र हे खोटे असल्याचे त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष पुर्ण होत आहे. त्यामुळे विजयादशमी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. यानिमित्तानं अमरावतीत होणाऱ्या संघाच्या विजयादशमी उत्सवावरून वाद निर्माण झाला आहे.
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री डॉ. कमलताई गवई या अमरावती येथील संघाच्या विजयादशमी उत्सवाला हजर राहणार अशी पत्रिका संघानं छापली आहे. त्या पत्रिका वितरीत देखील झाल्या आहेत.
यामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून कमलताईंचे नाव छापलेले आहे. या पत्रिकेवरून बातम्या झाल्या. त्यानंतर आता कमलताईंच्या नावानं एक पत्रक व्हायरल झालं आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
त्यानंतर त्यांचे चिरंजीव राजेंद्र गवई यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून हे व्हायरल झालेलं पत्र कमलताई यांचं नाही, असं त्यांनी म्हटलंय.
हे पत्र खोटं आहे असं राजेंद्र गवई यांनी म्हटले आहे
राजेंद्र गवई म्हणाले, “संघाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण आईला आलेलं आहे आणि आईनं ते स्वीकारलं आहे. याआधी दादासाहेब गवई सुद्धा संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहे. तसंही गवई कुटुंबाचे पक्षाच्या पलीकडे संबंध आहेत.”
“अटलबिहारी वाजपेयी आणि गवईसाहेबांचे चांगले संबंध होते. पण, त्यांना पंतप्रधान होण्यासाठी मत पाहिजे होतं ते मत गवई साहेबांनी दिलं नव्हतं. एखाद्याच्या कार्यक्रमाला गेलं की, आपली विचारधारा बदलते असा अर्थ होत नाही. एकमेकाच्या कार्यक्रमात गेलं पाहिजे अशा मताचा मी आहे,” असंही गवई यांनी पुढे म्हटले .
आईसाहेबांनी अजून निर्णय घेतलेला नाही. पण, आईसाहेबांच्या मागे मी मुलगा म्हणून खंबीरपणे उभा राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संघाचे विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे म्हणाले, “कमलताईंनी निमंत्रण स्वीकारलं आहे आणि त्या या कार्यक्रमाला शंभर टक्के येणार आहेत. ते पत्र खोटं आहे हे सुद्धा समोर आले आहे. पत्र कोणी व्हायरल केलं, का केलं या गोष्टी वेगळ्या आहेत.”


















