Home Uncategorized भाजपला देश, राज्य सांभाळता येत नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात! म्हणून केंद्राकडून मदतीला...

भाजपला देश, राज्य सांभाळता येत नाही; उद्धव ठाकरेंचा घणाघात! म्हणून केंद्राकडून मदतीला उशीर?

89
0

मराठवाड्यातील पूरस्थितीचं गांभीर्य पाहत अनेक नेत्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली. उद्धव ठाकरेसुद्धा यात मागे नव्हते. सरकारकडून शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न असेल, असं आश्वासक वक्तव्य त्यांनी पूरग्रस्तांना उद्देशून केलं. मराठवाडा दौऱ्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी प्रभावित भागात मदत पोहोचवण्यासाठी होणाऱ्या दिरंगाईवरून सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांत टीका केली. भाजपला देश, राज्य सांभाळता येत नाही, अशा आशयाचं वक्तव्य त्यांनी केलं.

 

रोज आत्महत्याच्या बातम्या येत आहेत. माझ्या दौऱ्यादरम्यान एका घरात गेलो आणि मन सुन्न झालं. तिथं ३१ वर्षांच्या एका मुलानं आत्महत्या केली. जेमतेम १५ दिवसांचं त्याचं बाळ…. एकत्र मोठं कुटुंबातला हा कर्ता पुरुष, डोक्यावर २ लाखांचं कर्ज. आता ही शेतकऱ्यांची थट्टा सुरु आहे, मागील २ ते ३ वर्षात जाहीर केलेली 14 हजार कोटींची मदत अद्याप शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. 2017 च्या कर्जमाफीची अद्याप प्रतिक्षा आहे. ज्या ज्या वेळी संकट आलं, आम्ही पंचांग काढून बसलो नाही. मला यात राजकारण आणायचं नाही. पण, शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या असं बोलणं मुख्यमंत्र्यांना राजकारण वाटत असेल तर त्यांनी तसं समजावं’, असं ठाकरे स्पष्ट म्हणाले.

 

…म्हणून महाराष्ट्रात मदत पोहोचत नाही?

‘पंजाबमध्ये हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर केले. याला म्हणतात सरकार. तसंच हिमाचललाही मदत जाहीर केली. पंजाबच्या धर्तीवर महाराष्ट्रातील डबल इंजिन सरकारनं शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटले आणि चर्चा केली, पण समोर दिसत असताना चर्चा काय करायची? पंतप्रधानांनी या मदतीसाठीचा प्रस्ताव सांगितला. महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून पंतप्रधान इथे येत नाहीयेत का? पण बिहारमध्ये पंतप्रधानांनी आताच निवडणुकांच्या धर्तीवर महिलांच्या खात्यावर १०-१० हजार रुपये टाकले आहेत. ७५ लाख महिलांना ही रक्कम मिळणार. मतचोरी पकडल्यावर आता काय बिहार खरेदी करणार? बिहारला मदत केल्यानं आम्हाला पोटदुखी मुळीच नाही. मात्र ज्या महाराष्ट्रानं तुमच्याच मते भरभरून मतदान केलं, त्या महाराष्ट्रातील शेतकरी संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट पाहताय?

 

हे सरकार कुचकामी सरकार आहे. आज मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्या, शेतकऱ्यांना जाणाऱ्या बँकांच्या नोटिशी थांबवा’, असा आर्जवी सूरही त्यांनी आळवत आपल्याला इथं राजकारण करायचं नसल्याचं स्पष्ट सांगितलं.

पीएम केअर फंडसंदर्भातील शासनाच्या स्पष्टीकरणासंदर्भातील प्रश्नाला अनुसरून उत्तर देत असताना, “आपल्याला एका गोष्टीवर गाढ विश्वास बसला असून भाजपला प्रशासन चालवता येत नाही असं म्हणत ते केंद्रात आणि राज्यात अपयशी ठरल्याचं म्हणत भाजप आणि प्रशासनाचा दूरान्वये संबंध नाही.” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.

उद्धव ठाकरेंनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाला भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांना सरकारकडून अधिकाधिक मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू, असं आश्वासन दिलं.

उद्धव ठाकरेंच्या मते, ‘आजपर्यंत अस्मानी संकट आलेलं नाही अशी बाब नाही, पण यावेळची परिस्थिती भयंकर आहे. मी बोलतानाही मराठवाड्यात पाऊस सुरू आहे.’ पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास वाहून गेला असून, सगळा संसार आणि आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. भरीस भर म्हणजे कर्जाचं ओझं.

शेतकऱ्यांच्या मुख्य मागण्या काय आहेत?
शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी केली आहे, कारण पिकं सडली आहेत आणि ते धाय मोकळून रडत आहेत. उद्धव ठाकरेंनी म्हटलं, ‘हीच खरी वेळ आहे, शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून बाहेर काढा.’ जमिनी खरवडून गेल्याने ३-५ वर्ष लागतील ती कसण्यायोग्य करण्यासाठी, असंही शेतकऱ्यांनी सांगितलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here