Home Uncategorized *एक अविस्मरणीय गौरवक्षण:*

*एक अविस्मरणीय गौरवक्षण:*

67
0

*आणि तो दिवस आला…!*
*”शहीद कॅप्टन विनायक गोरे” या एकपात्री नाटिकेच्या ५००० व्या प्रयोगाचे लवकरच होणार सादरीकरण..!*

नमस्कार,
आज मी तुमच्याशी केवळ एक कलाकार म्हणून नाही, तर के.जे. सोमय्या कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, विद्याविहार चा एक कृतज्ञ विद्यार्थी आणि तुमच्यासारखाच एक निष्ठावान भारतीय नागरिक म्हणून संवाद साधत आहे. आजपासून जवळजवळ तीन दशकांपूर्वी, २६ सप्टेंबर १९९५ रोजी, आपल्या भारतमातेचा एक वीर सुपुत्र, अवघ्या २७ वर्षांचा कॅप्टन विनायक गोरे यांनी जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (LOC) शत्रूंशी लढताना सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या शौर्याला आणि आणि त्यांच्या पालकांच्या त्यागाला मानवंदना देण्यासाठी, त्यावेळचा मी एन.सी.सी. कॅडेट आणि के. जे. सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी असताना २७ सप्टेंबर १९९५ रोजी “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या माझ्या एकपात्री लघुनाटिकेचा पहिला प्रयोग सादर केला होता.
गेल्या जवळपास ३० वर्षांपासून, मी या एकपात्री नाटिकेच्या माध्यमातून इयत्ता आठवीपासून ते विविध वयोगटातील विद्यार्थी आणि नागरिकांना मी भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित करत आहे. ज्यांना सैन्यात जाऊन देशसेवा करणे शक्य नाही, त्यांनाही मी आवाहन करतो की, आपण आपल्या सध्याच्या क्षेत्रात राहूनही समाज आणि देशासाठी मोठे योगदान देऊ शकतो. रक्तदान, अवयवदान, ध्वजदिन निधी संकलन, तसेच सैनिक आणि त्यांच्या कुटुंबांचा आदर करणे, आई-वडील आणि गुरुजनांना विसरू नये, अशा अनेक समाजोपयोगी आणि राष्ट्रोपयोगी मूल्यांचे मी प्रबोधन करीत आहे.
आणि आता… तो क्षण जवळ आला आहे! ज्या क्षणाची मी गेली अनेक वर्षे वाट पाहत होतो, तो माझ्या एकपात्री नाटिकेचा ५००० वा प्रयोग लवकरच सादर होणार आहे! आणि मला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की, ही सुवर्णसंधी मला माझ्याच जन्मभूमीसम असलेल्या के.जे. सोमय्या कॉलेजने दिली आहे.
येत्या ९ सप्टेंबर २०२५ रोजी, के.जे. सोमय्या समूहाचा “फाउंडेशन डे” मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. याच विशेष सोहळ्यामध्ये, “शहीद कॅप्टन विनायक गोरे” या माझ्या एकपात्री प्रयोगाचा ५००० वा प्रयोग सादर करण्याची संधी मला माझ्या कॉलेजने दिली आहे.याबद्दल मी माझ्या महाविद्यालयाचा आणि प्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारी वर्ग, आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभारी आहे.
हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही, तर शहीद कॅप्टन विनायक गोरे यांच्या पवित्र स्मृतींना आणि आपल्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांच्या त्यागाला वंदन करण्याचा हा एक अनोखा क्षण आहे. हा प्रयोग केवळ एक कला सादर करण्याचा सोहळा नसून, येणाऱ्या पिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करण्याचा, कर्तव्यनिष्ठेची भावना रुजविण्याचा आणि समाजसेवेसाठी प्रेरित करण्याचा एक प्रयत्न आहे.
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी, आणि आपल्या राष्ट्रवीरांना आदरांजली वाहण्यासाठी, मी आपण सर्वांना नम्रपणे आवाहन करतो की, ९ सप्टेंबर २०२५ रोजी के.जे. सोमय्या कॉलेजमध्ये आयोजित या विशेष कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे.
आपली उपस्थिती हेच माझ्यासाठी सर्वात मोठे प्रोत्साहन असेल.
*भारतमाता की जय! वंदे मातरम्!*
*जय हिंद! जय महाराष्ट्र!*

आपला विश्वासू,
मनोज सुमन शिवाजी सानप
जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे आणि
(माजी विद्यार्थी आणि माजी एनसीसी कॅडेट, के.जे. सोमैया कला आणि वाणिज्य महाविद्यालय, विद्याविहार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here