*प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण*
मुंबई
देशाच्या ७९ वा स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मुख्य कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कोषाध्यक्ष व माजी आ. हेमंत टकले, प्रवक्त्या व माजी आ.विद्या चव्हाण, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र पवार , बबन कनावजे ,अदिती नलावडे व भालचंद्र शिरोळे,मुंबई विभागीय अध्यक्ष राखी जाधव, माजी महापौर निर्मला सामंत – प्रभावळकर आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, ” महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास घडलेला आहे. या स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांनी राष्ट्रपुरुषांनी हौतात्म्य पत्करल्यानंतर हा देश स्वतंत्र झाला. अनेक धर्म जातीच्या लोकांनी यासाठी योगदान दिले आहे. आज परिस्थिती बदललेली आहे. देशाचे सध्याचे अनेक राष्ट्रांसोबत असलेले संबंध हे आज विचार करण्यासारखे आहे. देशाच्या जनतेमध्ये एकतेची भावना आहे स्वतंत्र्याच्या दिवशी आपण स्वतंत्र आहोत का असा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे.
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष कार्यान्वित करत असताना माझ्यावर जबाबदारी आहे. मी असेल सुप्रियाताई असेल आपण सर्व पदाधिकारी एका नवीन विचारातून लढा देण्यासाठी आपण उभे राहिलेलो आहे. आपली लढाई एवढीच आहे की लोकशाही जिवंत राहिली पाहिजेत, आज लोकशाहीवर आपल्याच देशात आघात होतो का त्यासाठी आपण स्वातंत्र्य मिळवलं का याचा विचार करण्याची गरज आज आहे.असे शशिकांत शिंदे म्हणाले.
याप्रसंगी खा.सुप्रिया सुळे यांनी स्वातंत्र्य लढ्यात हौताम्य पत्करणाऱ्या, योगदान देणाऱ्या प्रत्येकाला अभिवादन करत देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर म्हणजेच पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपेरेशन सिंदूर, संसदीय अधिवेशनातील विषय आणि मताधिकार आंदोलनावर भाष्य केलं त्या म्हणाल्या की, “दिल्लीत निवडणूक आयोग मुख्यालयावर झालेल्या मताधिकार आंदोलनात आदरणीय पवार साहेब आवर्जून सहभागी झाले, कारण प्रश्न लोकशाहीचा होता. निवडणुका येतील आणि जातील, पण हा देश व इथली लोकशाही कायम टिकली पाहिजे.”
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण सैनिकांच्या हस्ते करण्यात यावे, अशी मी मागणी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे करते आज आपण देशाचा ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, परंतु हा दिन आपण केवळ आर्मी, नेव्ही, एयरफोर्स यांच्यामुळे साजरा करू शकत आहे. त्यामुळे इथून पुढे २६ जानेवारी असो किंवा १५ ऑगस्ट सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावं सैनिकांचा मानसन्मान आपण केला पाहिजे.”
“काही महिन्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये अनेक निष्पक नागरिकांचा जीव गेला होता. पुण्यातील जगदाळे कुटुंब देखील या हल्ल्याचे बळी पडले आहे. या कुटुंबातील कर्ता पुरुष या हल्ल्यात शहीद झाला आहे. आजही त्या कुटुंबांना डोळे बंद केल्यानंतर सर्व प्रसंग डोळ्यासमोर दिसतो त्या कुटुंबांचे म्हणणे आहे की ,आमची काय चूक आहे. आम्ही सुट्टी साजरी करण्याकरिता जम्मू-काश्मीरमध्ये गेलो होतो. या हल्ल्यातील पीडित कुटुंब आजही विचारतात या हल्ल्यातील आतंकवाद्यांना कधी पकडणार आणि त्यांना कधी फाशीची शिक्षा होणार असे वारंवार मला विचारतात पण याचं खरंच उत्तर आपल्याकडे आहे का?” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.



















