Home Uncategorized कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही आत्मनिर्भर भारत अन् महाराष्ट्र -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कुठल्याही शक्तीपुढे झुकणार नाही आत्मनिर्भर भारत अन् महाराष्ट्र -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

62
0

पाकिस्तानच्या धमक्यांना भारत भीक घालणार नाही !

ठाणे : “देशवासीयांवर हल्ला करणाऱ्या दशहतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे जशास तसे प्रत्युत्तर आपण दिले आहे. ‘ऑपरेशन महादेव’ द्वारे या दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. पाकिस्तानच्या आसिफ मुनीरच्या भ्याड धमक्यांना भारत भीक घालणार नाही.” असे स्पष्ट प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
आपल्या देशावर टॅरीफ लादण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला असला तरीही भारत आत्मनिर्भर असल्याने त्यांचा आपल्या अर्थव्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही.” असेही उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात ध्वजारोहण केले.
याप्रसंगी ते बोलत होते. “ज्या वीरांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचा विसर पडता कामा नये. देशाची आज चहुबाजुंनी प्रगती होत असून देशाची अर्थव्यवस्था चौथ्या वरुन तिसऱ्या स्थानी जात असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. “देशाच्या विकासात महाराष्ट्राचे योगदान सर्वात मोठे असून, ठाणे जिल्हा यात मागे राहणार नाही. महायुती सरकारने जिल्ह्याला ३ हजार कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे त्यानुसार ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलतो आहे.
उद्योग, शेती, स्वयंरोजगार यात जिल्हा अग्रेसर आहे. जिल्ह्यात बुलेट ट्रेन, मेट्रो, रस्ते, पुल अशी अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत.
ठाणे – बोरीवली टनेल, कोस्टल हायवे याद्वारे वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ठाणे मेट्रोच्या कामांची पहिली चाचणी सप्टेंबर महिन्यात पुर्ण होणार आहे तसेच अंतर्गत मेट्रोलाही मंजुरी दिलेली आहे. गडकरी रंगायतनचे नूतनीकरण होऊन तेही सेवेत दाखल होत आहे. एक प्रगत, सुखसोयींनी युक्त ठाणे जिल्हा घडवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. याप्रसंगी खा. नरेश म्हस्के, आ. संजय केळकर, माजी आ. रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे तसेच ठाणे जिल्ह्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here