ज्येष्ठ नाटककार विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’ हे मराठीसह भारतीय रंगभूमीवरील अत्यंत महत्त्वाचं नाटक! ‘घाशीराम कोतवाल’चा पहिला प्रयोग होऊन (१६ डिसेंबर १९७२) आज ५२ वर्ष झाली आहेत. हे नाटक आजवर दहा भारतीय आणि जगातील तीन भाषांमध्ये सादर झाले आहे. मात्र, हिंदीत हे नाटक व्यावसायिक रंगमंचावर सादर केले गेले नाही. त्यामुळेच हे अभिजात नाटक हिंदी रंगभूमीवरही सादर करण्याचा निर्णय घेत लेखक-दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल यांनी या हिंदी नाटकाचे शिवधनुष्य पेलले आहे. या नाटकाची पत्रकार परिषद नुकतीच झाली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे, ज्येष्ठ अभिनेते संजय मिश्रा, दिग्दर्शक अभिजित पानसे आणि भालचंद्र कुबल, नृत्य दिग्दर्शिका फुलवा खामकर आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना संजय मिश्रा म्हणाले की , “नाटक करण्याची फार मनापासून इच्छा होती परंतु चित्रपटांमुळे वेळ मिळत नव्हता. ‘घाशीराम कोतवाल’ ही अभिजात कलाकृती असून त्याचा अवकाश मोठा आहे. असं नाटक करायला मिळणं हे नट म्हणून मला समृद्ध करणार होत. त्यात उत्तम अशा टीमसोबत हे सगळं जुळून आल्यावर मी होकार दिला.” “एकीकडे मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी आणि ओटीटी सारखी नवीन माध्यमं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असताना, नाटकांनी प्रेक्षकांच्या मनात आपली जागा कायम राखली आहे. मराठी नाटकात आजच्या विवंचना, आनंद, संघर्षाचे प्रतिबिंब दिसते. मराठी रंगभूमीच्या प्रवाहातील मुख्य माध्यम म्हणून नाटकांकडे पहायला हवे “असेही ते म्हणाले.
या नाटकाला शुभेच्छा देताना अभिनेता मकरंद देशपांडे म्हणाले की, “नाटक जिवंत करण्याचं काम नट करत असतो. त्यातही ‘घाशीराम कोतवाल’ सारखं अजरामर नाटक आणि त्यातली भूमिका हे आव्हानच! हे आव्हान संजय मिश्रासारखा कसलेला नट आणि अभ्यासू दिग्दर्शक अभिजित पानसे अशी मंडळी येऊन करतायेत ही नक्कीच मोठी गोष्ट आहे. अशा कलाकृती प्रेक्षकांपर्यंत पोहचणं अधिक महत्त्वाचं आहे.”
हे नाटक अमराठी प्रेक्षकांपर्यंत पोचविण्यासाठी आम्ही ते हिंदीत सादर करत आहोत. मूळ नाटकात नृत्य व संगीताला महत्त्वाचे स्थान होते. या नाटकाचा बाज आजच्या काळाला अनुरुप सादरीकरणाच्या दृष्टीने लाइव्ह संगीत १२ ते १५ वाद्यांचा संच मराठी लावणी आणि कव्वाली असा नजराणा या नाटकात आहे.” असं दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी सांगितले.
हे नाटक आकांक्षा माळी यांच्या ‘३३ एएम स्टुडिओ’, अनिता पालांडे आणि अभिजित पानसेंच्या रावण फ्युचर प्रोडक्शनतर्फे सादर होणार आहे. संजय मिश्रांसह , संतोष जुवेकर, उर्मिला कानिटकर आणि ६० कलाकारांचा संच नाटकात काम करणार आहेत. नाटकाचा शुभारंभ १४ ऑगस्ट बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा येथे , १५ ऑगस्ट बालगंधर्व रंगमंदिर बांद्रा , २३ ऑगस्ट टाटा थिएटर एनसीपीए त होणार असूून हे तीनही प्रयोग रात्री ८ वा होणार आहेत.
नाटकाची हिंदी संहिता प्रसिद्ध साहित्यिक प्रा. वसंत देव यांनी लिहिली आहे. पेशवेकालीन इतिहासाची पार्श्वभूमी असलेल्या या नाटकातून तेंडुलकरांनी वर्तमानकालीन राजकीय परिस्थितीवर भाष्य केले आहे. सत्ताधारी नाना फडणवीस घाशीराम कोतवालाला आपल्या मर्जीनुसार खेळवतो, त्याच वेळी समाजालाही खेळवतो. वेगवेगळ्या क्षेत्रात या घाशीरामाचे दर्शन आपल्याला प्रत्यही घडत असते, क्रौर्यतेच्या परिसीमेचे असे दर्शन घडवणार हे नाटक त्या दृष्टीने कालातीत आहे असे म्हणता येईल.
गीते प्राध्यापक अशोक बागवे, चंद्रशेखर सानेकर, सुनिता शुक्ला त्रिवेदी व मंदार देशपांडे यांची, नेपथ्य संदेश बेंद्रे , नृत्य दिग्दर्शन फुलवा खामकर, संगीत मंदार देशपांडे ,प्रकाश योजना हर्षवर्धन पाठक ,वेशभूषा व वस्त्रसंकल्पना अभिजित पानसे, वस्त्रकौशल्य चैत्राली डोंगरे , वस्त्रनिर्मिती बळवंत काजरोळकर यांची आहे. निर्मिती प्रमुख मंदार टिल्लू , व्यवस्थापक संतोष महाडिक आहेत.
नाटकाचे प्रयोग ‘नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स’ च्या वतीने नरीमन पॉईंट येथील टाटा थिएटर मधे होणार असून कार्यकारी अधिकारी राजेश्री शिंदे यांनी या सहकार्याबाबत म्हटलं आहे की, “घाशीराम कोतवालच्या निर्मितीशी जोडले गेलो आहोत याचा आम्हाला अत्यंत आनंद आहे. विजय तेंडुलकर यांचे प्रतिष्ठित नाटक घाशीराम कोतवालच्या नव्या सादरीकरणाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये चांगलीच वाढीस लागली आहे.”
















