वसई – “स्वयं पुनर्विकास हे जन आंदोलन म्हणून पुढे आलेय. ठाणे, पनवेल, घणसोली येथे सभा, बैठका झाल्या. तुडुंब गर्दी होती. ही गर्दी माझ्यासाठी नाही तर लोकांचा प्रश्न, गरज आहे त्यासाठीची होती. स्वयं पुनर्विकासाचे हे शिवधनुष्य आम्ही उचलले आहे आणि ते पेलणार आहोत”, असा विश्वास भाजपा गटनेते व मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.
आज वसई येथे भाजपा आ. स्नेहा दुबे-पंडित यांच्या पुढाकाराने स्वयं पुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नालासोपारा येथील आ. राजन नाईक, भाजपा वसई-विरार जिल्हाध्यक्षा प्रज्ञा पाटील, प्रांतधिकारी शेखर घाडगे, सहकार खात्याचे उपनिबंधक शिरीष कुलकर्णी, अमन शिंदे, ठाणे हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी शरद काशिवले, निलेश पेंडुलकर, राजाराम मुळीक, ईश्वर घोले, अभ्यासक हर्षद मोरे यांसह मोठ्या संख्येने वसईकर नागरिक उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दरेकर म्हणाले की, “मुंबईत होत असलेला स्वयं पुनर्विकास वसईत झाला पाहिजे, ही भावना घेऊन स्नेहा दुबे-पंडित काम करताहेत. स्वयं पुनर्विकास म्हणजे मोठी टेक्नॉलॉजी नाही. विकासकाशिवाय आपली सोसायटी विकसित करायची.विकासक पैसे लावतो आणि परवानग्या मिळवून देतो यासाठी आपण त्याकडे जातो. मी मुंबई जिल्हा बँकेचा अध्यक्ष आहे. त्या बँकेच्या गृहनिर्माण संस्था सदस्य आहेत. या सोसायट्यांना पैसे पुरवले व सरकारने पाठबळ दिले तर कशाला विकासक हवा हा विचार करून मुंबई बँकेचे कर्ज धोरण आणले. सरकारचे पाठबळ मिळणार नसेल तर या योजनेला गती मिळणार नाही हे लक्षात आले. यासाठी गोरेगावला गृहनिर्माण संस्थांची परिषद घेतली. या परिषदेत १८ मागण्या शासनाकडे केल्या. त्यापैकी १६ शासन निर्णय फडणवीस यांनी तात्काळ काढले. त्यानंतर स्वयं पुनर्विकासाला हळूहळू गती मिळाली. आज मुंबई बँकेच्या पुढाकाराने २० इमारती उभ्या राहिल्या असून लोकं तिथे राहायला गेली असल्याचे दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, कांदिवली येथील श्वेतांबरा इमारतीच्या चावी वाटप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः आले होते. या कार्यक्रमात त्यांनी स्वयं पुनर्विकासाला गती मिळण्यासाठी आणखी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, केवळ ही मुंबईची गरज नसून राज्यातील सर्व शहरांची गरज आहे. म्हणून समिती स्थापन केली.
जो अहवाल तीन महिन्यात सादर करायचा होता तो अडीच महिन्यातच सरकार दरबारी मी सादर केला. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी झोपडपट्टीतील नागरिकांसाठी अफजलपुरकर समितीच्या माध्यमातून एसआरएची निर्मिती केली. तसाच माझ्या समितीच्या माध्यमातून राज्यात स्वयं पुनर्विकास ताकदीने होईल, असा विश्वास यावेळी दरेकरांनी व्यक्त केला.
*स्वयंपुनर्विकास जनआंदोलन म्हणून पुढे आलेय*
दरेकर म्हणाले की, स्वयंपुनर्विकास जनआंदोलन म्हणून पुढे आलेय. स्वयं पुनर्विकास म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. येथे गुणवत्तेला स्थान आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वच क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यास सांगितलेय. हौसिंगमध्येही आत्मनिर्भर व्हायचंय.
*पाच इमारतींचे भूमिपूजन महिन्याभरात करा*
दरेकर म्हणाले की, मुंबई बँकेला मर्यादा आहेत. १६०० प्रस्ताव आमच्याकडे आलेत. मुख्यमंत्री यांना विनंती केली त्यांनी राज्य सहकारी बँकेला सांगितले. त्यांच्याकडून दीड हजार कोटी, एनसीडीसीकडून एक हजार कोटी या योजनेसाठी मिळणार आहेत. त्याचबरोबर सेल्फ डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन करण्याची विनंतही सरकारला केली आहे. त्याला तत्वतः मान्यताही मिळालीय. त्यामुळे स्वयं पुनर्विकासाचे काम गतीने होणार आहे.जनतेच्या अपेक्षांची पुर्तता करण्याचे काम आपले आहे. सरकार, मुख्यमंत्री फडणवीस पाठीशी आहेत. पाच इमारती वसईत उभ्या करा तेव्हा लोकांचा या योजनेवर विश्वास होईल. या पाच इमारतींचे भूमिपूजन महिन्याभरात करा. इमारत उभी राहिली की चावी वाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांना घेऊन येऊ, असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला.
*आमदार स्नेहा दुबे-पंडित यांच्यावर मोठी जबाबदारी*
दरेकर अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची जबाबदारी सरकारी समन्वय यंत्रणा म्हणून त्याच्या प्रमुख पदी आ. स्नेहा दुबे-पंडित यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार करत असल्याची घोषणा दरेकर यांनी या कार्यक्रमात केली. जेणेकरून हा विषय मुंबईत जसा पुढे जातोय तसाच पालघर जिल्ह्यात पुढे जावा. वसईकरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. जनतेला स्वयं पुनर्विकास विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपापल्या कार्यालयात कक्ष स्थापन करा, असे आवाहनही दरेकर यांनी केले.
00000




















