Home मुंबई गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत...

गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी पहिल्‍या बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग जोडण्‍याची कार्यवाही गुरूवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी पूर्णत्‍वास येत आहे.

5
0

गोरेगाव – मुलुंड जोड मार्ग (GMLR) प्रकल्पाच्या टप्पा ३ – ब अंतर्गत दादासाहेब फाळके चित्रनगरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या जुळ्या बोगद्यांच्या बांधकामासाठी पहिल्‍या बोगदा खनन संयंत्रा (TBM) चे सुटे भाग जोडण्‍याची कार्यवाही गुरूवार, दिनांक ३० जुलै २०२६ रोजी पूर्णत्‍वास येत आहे.

अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी आज कार्यस्‍थळास प्रत्‍यक्ष भेट देत कामकाजाची पाहणी केली. तसेच, आवश्‍यक ते निर्देश दिले.

पहिल्‍या बोगदा खणन संयंत्राची संपूर्ण यंत्रणा प्रकल्‍पस्‍थळी स्थापित झाल्यानंतर कार्यक्षमता, सुरक्षितता आणि सर्व प्रणालींचे एकत्रित कार्य योग्यरित्या होत आहे की नाही याची प्रत्यक्ष तपासणीसाठी प्रकल्‍पस्थळ स्वीकृती चाचणी (Site Acceptance Test – SAT) यशस्‍वीपणे पार पडली आहे. यात प्रामुख्‍याने यांत्रिक, विद्युत, हायड्रॉलिक, नियंत्रण व सुरक्षा प्रणालीच्‍या तपासणीचा समावेश आहे.

गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी ते मुलुंड येथे खिंडीपाडा पर्यंत जुळा व भूमिगत बोगदा बांधण्‍यात येणार आहे. एकमेकांना समांतर असे हे जुळे बोगदे प्रत्‍येकी ४.७० किलोमीटरचे आहेत. या समांतर बोगद्यांचा व्यास १४.२० मीटर तर संजय गांधी राष्ट्रीय अभयारण्य परिसरात १३ मीटरचा आहे.

बोगदा खनन संयंत्र हे सिंगल शिल्ड अर्थ प्रेशर बॅलन्स (EPB) हार्ड रॉक प्रकारातील असून कापणी यंत्राचा (Cutter) व्यास १४.४९ मीटर आणि एकूण लांबी ८३ मीटर आहे. यात २२ मीटर लांबीचा शिल्ड भाग आणि ६१ मीटर लांबीची तीन मजली बॅक अप गॅन्ट्री समाविष्ट आहे.

या बोगदा खणन सयंत्रामध्‍ये पूर्णपणे स्वयंचलित मलबा (Muck) हाताळणी प्रणाली बसविण्यात आली आहे. त्यामध्ये ३४० मीटर लांबीची कन्व्हेयर प्रणाली, क्रॉस कन्व्हेयर आणि स्टॅकर कन्व्हेयर यांचा समावेश आहे. त्यामुळे आव्हानात्मक भूगर्भीय परिस्थितीतही मलब्याची कार्यक्षम वाहतूक, अधिक उत्पादनक्षमता आणि सुरक्षित कामकाज सुनिश्चित होणार आहे.

सर्व तांत्रिक चाचण्या निर्धारित निकषांनुसार पूर्ण झाल्‍यानंतर प्रत्‍यक्षात बोगदा खोदकामास सुरूवात केली जाईल. फेब्रुवारी २०२९ पर्यंत प्रकल्‍प पूर्ण करण्‍यासाठी महानगरपालिका प्रयत्‍नशील असल्‍याचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर यांनी सांगितले.

प्रमुख अभियंता (पूल) श्री. राजेश मुळे, उपप्रमुख अभियंता (पूल) श्री. नरेश मेघराजानी यांच्‍यासह संबंधित अधिकारी, अभियंते उपस्थित होते.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here