Home मुंबई *माध्यमांनी जेंडर सेन्सिटिव्हिटीचा स्वीकार करणे काळाची गरज* – वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता

*माध्यमांनी जेंडर सेन्सिटिव्हिटीचा स्वीकार करणे काळाची गरज* – वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता

11
0

*‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ कार्यशाळेत आवाहन*

मुंबई, दि.20 : माध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या शब्दांमधून समाजाची मानसिकता घडते. त्यामुळे पत्रकारितेत जेंडर सेन्सिटिव्हिटी (लैंगिक संवेदनशीलता) आणि जेंडर-न्यूट्रल भाषा वापरणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी केले.

राष्ट्रीय महिला आयोग आणि महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित ‘महिला, माध्यमे आणि तंत्रज्ञान’ या एक दिवसीय कार्यशाळेत नवी दिल्ली येथील वरिष्ठ पत्रकार स्वाती गुप्ता यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, माहिती व जनसंपर्क महासंचालक तथा प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, प्रख्यात लेखिका डॉ.रिचा सूद आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्वाती गुप्ता यांनी सुरूवातीस काही वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या मथळ्यांचे उदाहरण देत त्यातील असंवेदनशीलता स्पष्ट केली. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये पीडितेची अनावश्यक वैयक्तिक माहिती देणे, तिची ओळख उघड होईल अशी माहिती प्रकाशित करणे किंवा चुकीचा दरवाजा ठोठावल्याने घटना घडली” अशा प्रकारे पीडितेलाच दोषी ठरवणारे मथळे देणे ही गंभीर चूक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, काही बातम्यांमध्ये मुख्य विषयापेक्षा गौण गोष्टींना अधिक महत्त्व दिले जाते, ज्यामुळे वाचकांमध्ये संभ्रम निर्माण होतो, असेही त्यांनी नमूद केले.

पत्रकारितेतील शब्द आणि चित्रे समाजाच्या धारणा घडवतात. वारंवार वाचल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे लोकांची विचारसरणी तयार होते. त्यामुळे ‘कोणी गुन्हा केला’ यापेक्षा ‘कोणावर गुन्हा झाला’ यावर भर दिल्यास चुकीचा संदेश जातो, असे त्यांनी सांगितले. उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, ‘महिलेवर अत्याचार’ असे म्हणण्याऐवजी ‘पुरुषाने अत्याचार केला’ असे लिहिल्यास गुन्हेगारावर लक्ष केंद्रित होते.

महिलांनी गुन्हा केल्यास त्याचे अतिनाट्यमय सादरीकरण केले जाते, तर महिलांविरुद्धचे गुन्हे अनेकदा कमी महत्त्वाचे दाखवले जातात, अशी टीकाही त्यांनी केली. महिलांच्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्या रूप, वैयक्तिक आयुष्य किंवा नैतिकतेवर भर दिला जातो, जे पूर्णपणे गैरलागू असल्याचे त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय गुन्हे नोंदवही (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार 2023 मध्ये महिलांविरुद्ध सुमारे 4.5 लाख गुन्हे नोंदवले गेले असताना, महिलांकडून होणारे गुन्हे अत्यल्प आहेत. तरीही माध्यमांमध्ये त्याचे अतिप्रदर्शन होते, असे श्रीमती गुप्ता यांनी सांगितले.

महिलांच्या यशाबाबतही माध्यमांमध्ये भेदभाव दिसून येतो. पुरुष खेळाडूंना अधिक प्रसिद्धी मिळते, तर महिला खेळाडूंच्या कामगिरीला तुलनेने कमी स्थान दिले जाते. यामुळे समाजात चुकीचा संदेश जातो, असेही स्वाती गुप्ता यांनी सांगितले.

पत्रकारितेत ‘चेअरमन’ ऐवजी ‘चेअरपर्सन’, ‘कॅमेरामन’ ऐवजी ‘कॅमेरा ऑपरेटर’ अशा जेंडर-न्यूट्रल शब्दांचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच, ‘महिला डॉक्टर’ म्हणण्याऐवजी फक्त ‘डॉक्टर’ असा उल्लेख करणे अधिक योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

“फेक न्यूज आणि सार्वजनिक हिंसा यांचा परस्पर संबंध आहे,” असे सांगत स्वाती गुप्ता यांनी माध्यमांनी जबाबदारीने बातम्या कराव्यात असे आवाहन केले. सनसनाटीपणापेक्षा तथ्याधारित आणि संवेदनशील रिपोर्टिंगला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

“आपण आज जे लिहितो, त्यावरून उद्याच्या पिढीची मानसिकता ठरणार आहे,” असे सांगून त्यांनी माध्यमांना आत्मपरीक्षण करण्याचे आवाहन केले. समाज अधिक संवेदनशील आणि समतोल बनवण्यासाठी शब्दांची ताकद सकारात्मक दिशेने वापरण्याची गरज असल्याचेही पत्रकार स्वाती गुप्ता यांनी सांगितले.
000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here