Home मुंबई *अभिजात मराठी आणि ऑनलाईन मराठीचा सेतू निर्माण करण्याची काळाची गरज* — मराठी...

*अभिजात मराठी आणि ऑनलाईन मराठीचा सेतू निर्माण करण्याची काळाची गरज* — मराठी भाषा सचिव डॉ. किरण कुलकर्णी

72
0

*मराठी भाषेतील सर्व मजकूर ऑनलाईन सर्चेबल असावा; परिसंवादात तज्ज्ञांचा सूर*

मुंबई, दि. ४ : ‘अभिजात मराठी आणि ऑनलाईन मराठी या दोन्हींच्या संगमातून मराठी भाषेचे भविष्य घडणार आहे. बदलत्या काळात तंत्रज्ञानाचे भान ठेवून भाषेचे अस्तित्व टिकवणे आणि तिचा अभिजातपणा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.” असे प्रतिपादन मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी केलं.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित ‘ऑनलाईन मराठी : स्थिती व गती’ या परिसंवादात ते बोलत होते. पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी येथे आयोजित या परिसंवादाचे अध्यक्षपद श्रीमती यादवडकर यांनी भूषविले. तर मंजुषा वैद्य, प्रसाद शिरगावकर, श्रीपाद ब्रह्मे, संजय देशपांडे, सुनील खांडबहालेख, निलेश छडविलकर, चिण्मय गव्हाणकर या तज्ज्ञ विचारवंतांनी या परिसंवादात आपली मते व्यक्त केली.

डॉ.कुलकर्णी म्हणाले की, “अभिजात मराठी आणि आधुनिक ऑनलाईन मराठी यांचा परस्पर संबंध समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे. अभिजात भाषा म्हणजे केवळ प्राचीन नव्हे, तर तिचा प्रभाव आजही संस्कृतीवर दिसून येतो. भाषा ही सतत बदलणारी, गतिशील गोष्ट आहे. मराठी ही एकसंध नसून २१६ बोलीभाषांचा संगम आहे. या सर्व बोलींनी मिळून प्रमाण मराठी आकाराला आली आहे.

डॉ. कुलकर्णी यांनी भाषेच्या सांस्कृतिक प्रभावाबद्दल बोलताना उदाहरण दिले की, एखादे व्यंगचित्र जरी भाषेशिवाय असले, तरी त्यातील आशय, पेहराव आणि संस्कृती जर मराठीपणाने ओतप्रोत असेल, तर ते मराठीचेच व्यंगचित्र ठरतं. म्हणजेच भाषेचा प्रभाव फक्त शब्दांपुरता नसून, तो दृश्य आणि अदृश्य अशा दोन्ही स्वरूपात जाणवतो.

आता डिजिटल युगात हीच परंपरा पुढे नेण्यासाठी ऑनलाईन मराठीचे बळकट होणे अत्यावश्यक आहे. फक्त शब्दलेखन समावेश करणे किंवा भाषांतर ॲप तयार करणे म्हणजे भाषेचा विकास नसून भाषेचा गाभा, तिचे अभिजातपण आणि तिची भावनिक ताकद ऑनलाईन माध्यमात उतरवणे ही खरी जबाबदारी आहे. मराठी भाषा विभागाच्या इतिहासात प्रथमच या क्षेत्रातील अग्रगण्य तज्ञ एकत्र आले आहेत. ही गोष्ट भाषेच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे डॉ. कुलकर्णी यांनी नमूद केले.
*भाषेचा विकास म्हणजे समाजाचा विकास*
– माधुरी यादवडकर

मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि समाजातील सर्व घटकांची सक्रीय भागीदारी आवश्यक असल्याचे प्रतिपादन परिसंवादाच्या अध्यक्ष श्रीमती माधुरी यादवडकर यांनी व्यक्त केले.

यादवडकर म्हणाल्या की,” भाषा ही फक्त लिहिलेली किंवा बोललेली नसते, ती आपल्या देहबोलीत, संस्कृतीत आणि जीवनशैलीत रुजलेली असते. तसेच भाषांतर म्हणजे फक्त शब्दांचे रूपांतर नव्हे, तर त्या भाषेच्या भावविश्वाचे जतन करणे होय. डिजिटल माध्यमांचा वापर आणि नव्या पिढीसमोर मराठी भाषेतील व्यवसाय, रोजगार आणि नवोपक्रमाच्या संधी मांडण्याचे त्यांनी आवाहन केले. मराठी भाषेकरिता ऑनलाईन व्यवसायाचा प्रचंड संधी आहेत. अनेक व्यावसायिक आज डिजिटल मराठी माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. हे उदाहरण सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचेही, त्यांनी नमूद केले.

यादवडकर म्हणाल्या की, “मराठी भाषा विभागाने लोकांपर्यंत मराठी भाषेकरिता व्यवसाय संधींची माहिती पोहोचवावी, प्रशिक्षण आणि आर्थिक सहकार्याच्या माध्यमातून तज्ञ तयार करावेत. भाषा केवळ शिकण्यापुरती न राहता ती उपजीविकेचे साधन बनावी, हीच खरी गरज आहे. मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थभाषा आणि राजभाषा बनावी, हे आपले सामूहिक स्वप्न आहे. तंत्रज्ञान आणि समाज यांचा संगम घडला, तर हे स्वप्न साकार होणार असल्याचेही, त्यांनी यावेळी सांगितले.

या परिसंवादात तज्ज्ञांनी मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी डिजिटल करण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषेचे अभिजातपण, भाषा वृद्धीसाठी मराठीचे ऑनलाईन होणे गरजेचे आहे. त्याच बरोबर कृत्रिम बुद्धिमत्तेत मराठीचा खूप चांगला वापर होत असल्याचे मत व्यक्त केले. नवीन पिढीने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून वाचन केले पाहिजे. काही तज्ज्ञांनी मराठी भाषा टिकल्या तरच मराठी भाषा टिकेल. त्यामुळे शासनाने मराठी शाळेची पटसंख्या अट ठेवू नये, असेही मत व्यक्त केले. मराठी कविता, मराठी शब्दकोष, मराठी साहित्य शासनाने इंटरनेटवर सहज शोधू शकेल, अशा स्वरूपात उपलब्ध करून द्यावे. त्याचबरोबर, शासनाने कॉपीराइट मजकूर सुद्धा मुक्तपणे उपलब्ध करून द्यावा. मोबाईलमधील टंक हा हिंदी डोळ्यासमोर ठेवून तयार केला असल्याने संबंधित कंपन्यांना मराठीसाठी किबोर्ड तयार करण्यासाठी आग्रह धरावा, असेही मत यावेळी व्यक्त केले. वेबसाईटवर टाकलेला मजकुराला मेटाडेटा करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मराठी भाषा ही जगात तीन नंबरवर आहे. मात्र ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मराठी मजकूर कमी प्रमाणात आहे. यासाठी मराठी माणसांनी आग्रही असण्याची गरज व्यक्त करण्यात आली. मराठी भाषेकरिता मराठी स्मॉल मॉडेल तयार करायला पाहिजे तसेच बोलून होणाऱ्या टंकलेखनाला महत्त्व द्यायला पाहिजे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या परिसंवादात मराठी भाषा विभागाचे सहसचिव नामदेव भोसले, विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
०००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here