स्टॅम्प ड्युटीचे नवीन वाढीव शुल्क रद्द करणारे सरकार येणे गरजेचे असल्याचेही व्यक्त केले मत.
मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी, महाराष्ट्र स्टॅम्प ॲक्ट नुसार १४ ऑक्टोबर पासून जे नविन वाढीव शुल्क आकारण्यात येत आहे त्यावर टीका केली आहे. शासन एकिकडे काही योजना राबवत आहे हे चांगलेच आहे पण दुसरीकडे पूर्वीच्या स्टॅम्पच्या दराच्या चौपट शुल्क आकारत आहे त्यामुळे सामान्य नागरीक, विद्यार्थी तसेच जनतेला कोट्यावधींचा भुर्दंड सोसावा लागत असल्याची टीका श्रीकांत सावंत यांनी केली आहे.
सध्या आचारसंहीता असल्याने राज्य सरकार आता हे दर कमी करु शकत नसेल तर माननीय न्यायालयाने यात हस्तक्षेप करुन तोडगा काढावा व सर्वसामान्यांना होणारा त्रास थांबवावा अशी विनंती श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशाद्वारे केली आहे.
श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे सांगितले आहे की, हे नवीन दर त्वरीत मागे घेण्यात यावेत. या वाढीचा त्रास विद्यार्थी, शेतकरी व सामान्य जनतेलाच होत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी तसेच राज्यातील विद्यमान आमदार, खासदारांनी याला विरोध केलाच पाहिजे. सर्वसामान्यांच्या खिशातून अचानक इतक्या मोठ्या प्रमाणावर पैसा जाऊ लागला तर दैनंदिन जीवन कसे चालणार असाही सवाल श्रीकांत सावंत यांनी केला आहे.
















