Home संभाजीनगर *मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय*

*मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय*

38
0

*विशेष लेख
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन – दि. १३ सप्टेंबर, २०२६*

*मराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्याय*
:-प्रविण टाके, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर

भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले; मात्र हैदराबाद संस्थानातील जनतेला भारतीय संघात सहभागी होण्यासाठी आणखी तेरा महिने प्रतीक्षा करावी लागली. या संस्थानात आजच्या मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांचा समावेश होता. १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.
*स्वातंत्र्य मिळाले; पण हैदराबाद विलीन झाले नव्हते:* १५ ऑगस्ट १९४७ नंतर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. निजाम मीर उस्मान अली खान यांनी स्वतंत्र अस्तित्वाची भूमिका घेतली. भारत सरकार आणि संस्थानात ‘जैसे थे’ करार झाला, मात्र गावागावांत रजाकारांविरुद्ध संघर्ष वाढला. हैदराबाद स्टेट काँग्रेस, महाराष्ट्र परिषद यांनी लोकचळवळीला दिशा दिली.
*मराठवाड्यात जागृतीची बीजे:* हा लढा अचानक नव्हता. परभणीचे नूतन विद्यालय, औरंगाबादचे सरस्वती भुवन, हिप्परगा शारदा मंदिर, अंबाजोगाई योगेश्वरी, उदगीर श्यामलाल, लातूर ज्युबिली, बीड चंपावती, नांदेड प्रतिभा निकेतन आदी संस्थांनी जागृती केली. स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे यांची प्रेरणा लाभली. १९३८ मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या स्थापनेने संघटित स्वरूप मिळाले. स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, दिगंबरराव बिंदू, रवी नारायण रेड्डी, देवीसिंह चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, शंकरसिंह नाईक, विजयेंद्र काबरा, बाळासाहेब परांजपे यांनी नेतृत्व केले.
*आठ जिल्ह्यांची लोकचळवळ:* छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली या आठ जिल्ह्यांनी मुक्तीत सहभाग नोंदविला. बीडमधील अंबाजोगाई हे स्वामी रामानंद तीर्थ यांचे केंद्र होते. नांदेड, परभणी, सेलू, जालना, अंबड, बीड, उस्मानाबाद, लातूर, अंबाजोगाई, उदगीर, उमरी, धर्माबाद, कंधार, देगलूर येथे सत्याग्रह झाले.
*दडपशाहीला प्रतिकार:* आंदोलनकर्त्यांना अटक, कारावास सहन करावा लागला. रजाकारांच्या हिंसेमुळे अडचणी वाढल्या. १९४२ च्या ‘भारत छोडो’ मध्ये नांदेड, वैजापूर, गंगापूर, परभणी, सेलू, उस्मानाबाद, बीड, अहमदपूर, जालना, अंबड येथे सत्याग्रहींना कारावास झाला.
*निजामाची आणि भारताची भूमिका:* भारत सरकारने संवादाचा मार्ग स्वीकारला, मात्र परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने सरदार वल्लभभाई पटेल यांनी निर्णायक भूमिका घेतली. १३ सप्टेंबर १९४८ रोजी ‘ऑपरेशन पोलो’ सुरू झाले. १७ सप्टेंबर १९४८ रोजी निजामाने शरणागती स्वीकारली आणि हैदराबाद भारतीय संघात विलीन झाले.
*भाषिक वेगळेपण:* १९४८ मध्ये विलीन झालेले हैदराबाद संस्थान आज एका राज्यात नाही. मराठवाडा महाराष्ट्रात, तेलुगू प्रदेश तेलंगणात, कन्नड प्रदेश कर्नाटकात गेला. १ मे १९६० रोजी मराठवाडा महाराष्ट्राचा भाग झाला.
*१७ सप्टेंबर : मुक्ती संग्राम दिन:* महाराष्ट्र शासनाने ४ मे २००१ रोजी शासन निर्णयाद्वारे १७ सप्टेंबर हा दिवस ‘मुक्ती संग्राम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण होते. १०० कोटी खर्चून येथे स्मारक उभारले जात आहे.
*इतिहासाचा सन्मान:* हा लढा लोकशाही, स्वातंत्र्य, नागरी हक्क, राष्ट्रीय एकात्मतेची जाणीव करून देतो. १७ सप्टेंबर हा अन्यायाविरुद्धच्या लोकशाही मूल्यांच्या आणि एकात्मतेच्या विजयाचे स्मरण आहे.

– *प्रविण टाके, उपसंचालक, विभागीय माहिती कार्यालय, छत्रपती संभाजीनगर*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here