*टीबीला घाबरू नका; वेळेवर उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होतो*
*– माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा*
*’टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत चेंबूर येथे जनजागृती फेरी*
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आणि स्वप्नांची नगरी आहे. या स्वप्ननगरीला टीबीमुक्त करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. समाजाने एकत्रितपणे प्रयत्न केल्यास टीबीमुक्त मुंबई आणि टीबीमुक्त भारताचे उद्दिष्ट निश्चितपणे साध्य होऊ शकते. टीबीविषयीचे गैरसमज दूर करून रुग्णांशी भेदभाव न करता त्यांना आधार देणे आवश्यक आहे. टीबीला घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. वेळेत निदान होऊन योग्य उपचार घेतल्यास टीबी पूर्णपणे बरा होऊ शकतो,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल श्री. जिष्णू देव वर्मा यांनी केले.
महाराष्ट्र लोकभवन, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) कक्ष आणि श्री नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियानांतर्गत आज (दि. २९ जुलै २०२६) जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले. चेंबूर येथील श्री. नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी, अभिनेते शिव ठाकरे, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, मा राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, महानगरपालिकेच्या एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त उज्ज्वल इंगोले तसेच राष्ट्रीय सेवा योजना कक्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा पुढे म्हणाले की, “टीबी हे केवळ वैद्यकीयच नव्हे, तर सामाजिक आणि आर्थिक आव्हानदेखील आहे. मात्र, या आजाराला घाबरण्याची आवश्यकता नाही. टीबीवर प्रभावी उपचार उपलब्ध असून रुग्णांनी वेळेवर तपासणी करून नियमित उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. केंद्र शासन, राज्य शासन तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमार्फत टीबी रुग्णांसाठी विविध उपचार सुविधा आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेऊन उपचार पूर्ण करावेत.”
ते पुढे म्हणाले की, “एखाद्या व्यक्तीला टीबी झाला म्हणून त्याच्याशी भेदभाव करणे योग्य नाही. उलट अशा रुग्णांना मानसिक आधार आणि आवश्यक ती मदत करणे हीच खरी माणुसकी आहे.”
राज्यपालांनी दाट लोकवस्तीच्या भागांमध्ये टीबीविषयी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. “विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका तसेच विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती अधिक प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने या अभियानात सक्रिय सहभाग घेतल्यास मुंबई लवकरच टीबीमुक्त होईल. आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे टीबी रुग्णांसाठी आशेचा नवा किरण निर्माण होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते राकेश बेदी म्हणाले की, “मुंबईकर कोणत्याही संकटाचा धैर्याने सामना करतात. प्रत्येक मुंबईकरामध्ये लढण्याची जिद्द आहे. ज्या पद्धतीने मुंबईकरांनी अनेक संकटांवर मात केली, त्याचप्रमाणे टीबीविरोधातील लढ्यातही त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा. ‘टीबीमुक्त मुंबई’ हे केवळ एक अभियान न राहता लोकचळवळ बनणे आवश्यक आहे. जनसहभाग जितका वाढेल तितके या अभियानाचे सकारात्मक परिणाम अधिक वेगाने दिसून येतील.”
***


















