मुंबई, दि. १५ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ‘प्रवेशोत्सव’ उपक्रमांतर्गत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी घाटकोपर पूर्व येथील पंतनगर परिसरातील मनपा शाळा क्रमांक ३ ला भेट देत विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले.
यावेळी मंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते नव्याने प्रवेश घेतलेल्या तसेच शाळेत दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना नवीन दप्तर, पाठ्यपुस्तके आणि लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी आणि शाळेच्या पहिल्या दिवसाची आनंददायी सुरुवात व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
मंत्री ॲड.शेलार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना नियमित शिक्षण घेण्याचे, जिज्ञासू वृत्ती जोपासण्याचे आणि उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम घेण्याचे आवाहन केले. तसेच राज्य शासन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार पराग शाह, मुंबईच्या महापौर रितू तावडे, जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, नगरसेविका राखी जाधव, मुख्याध्यापिका मीना आढव तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साहामुळे शाळेचा परिसर चैतन्यमय झाला होता.

















