Home मुंबई राज्यातील शेतकऱ्यांचा खरा कैवारी ,हर्षवर्धन सपकाळ यांच्या पदयात्रा चर्चेत

राज्यातील शेतकऱ्यांचा खरा कैवारी ,हर्षवर्धन सपकाळ यांच्या पदयात्रा चर्चेत

90
0

मुंबई

देशभराचे लक्ष पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे लागलेले असताना, राजकीय वातावरण पूर्णतः निकालाभोवती केंद्रित झाले होते. या निकालांना जणू काही ऐतिहासिक स्वरूप देत मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि इव्हेंट्स उभारले गेले. मात्र, याच काळात महाराष्ट्रात एक वेगळे चित्र पाहायला मिळाले.

निवडणूक निकालांच्या गदारोळात बहुतांश राजकीय नेते व्यस्त असताना, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी रणरणत्या उन्हात पदयात्रा काढून वेगळा संदेश दिला. बुलढाणा जिल्ह्यातील मानेगाव ते जळगाव जामोद दरम्यान ४४ अंश तापमानात काढण्यात आलेली ‘शिवसन्मान शेतकरी संघर्ष पदयात्रा’ ही त्यांच्या जनसंपर्क आणि संघर्षशील भूमिकेचे प्रतीक ठरली.

यापूर्वीही सपकाळ यांनी मराठवाड्यात तुळजापूर तसेच हिंगोली येथे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पदयात्रा काढल्या आहेत. या पदयात्रांमधून गावोगावी जाऊन शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. पदयात्रा हा केवळ आंदोलनाचा मार्ग नसून, जनतेशी थेट नाळ जोडण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.

सध्याच्या राजकारणात अनेक नेते मोठ्या ताफ्याशिवाय किंवा कार्यकर्त्यांच्या गर्दीशिवाय बाहेर पडत नाहीत, अशी टीका केली जाते. अशा पार्श्वभूमीवर सपकाळ यांचा साधेपणा आणि प्रत्यक्ष जनतेत जाऊन काम करण्याची पद्धत वेगळी ठरते. कोणताही दिखाऊपणा न करता, लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून लढण्याची त्यांची तयारी ही त्यांच्या नेतृत्वाची जमेची बाजू मानली जाते.

प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून सुमारे १४ महिन्यांच्या कालावधीत त्यांनी शेतकरी, महिला, युवक तसेच एमपीएससी परीक्षार्थींच्या प्रश्नांवर विविध आंदोलने आणि पदयात्रा राबवल्या आहेत. यामुळे एक सक्रिय आणि आक्रमक विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची प्रतिमा अधिक ठळक झाली आहे.

पदयात्रा ही परंपरा काँग्रेस पक्षाने आणि महात्मा गांधी यांनी रुजवलेली आहे. त्याच परंपरेचा वारसा पुढे नेत सपकाळ सध्या राज्यभर जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करताना दिसत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातून पुढे आलेले हे नेतृत्व आज राज्य पातळीवर कार्यरत असून, त्यांच्या या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे काँग्रेसला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, जनतेच्या प्रश्नांवर थेट लढा देणारी ही भूमिका आगामी काळात राज्याच्या राजकारणात महत्त्वाची ठरू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here