*मनस्मृती मानणारे संघाच्या प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देतील का?*
*काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांची भाजपावर सडकून टीका*
नागपूर, दि. १९ –पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून काल भाषण केले,ते देशाच्या पंतप्रधानांचे नव्हते तर भाजपच्या नेत्याचे आणि आचारसंहितेचे उल्लंघन करणारे भाषण होते, अशी जोरदार टीका काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथे केली आहे. पाच राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने रचलेल्या कट कारस्थानांचा’ल त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना समाचार घेतला.
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ५० हून अधिकवेळा काँग्रेसचे नाव घेतले. यावरून भाजपला काँग्रेसची किती भीती वाटते हे स्पष्ट होते. पंतप्रधानांचे हे भाषण राजकीय प्रचारासारखे असून त्यांनी आचारसंहितेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत.
महिला आरक्षणावरून भाजप केवळ इव्हेंटबाजी करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. ते म्हणाले की,
काँग्रेसने देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती, पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष आणि महिला पंतप्रधान दिल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षणही काँग्रेसनेच दिले.
२०२३ मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाची अंमलबजावणी ‘मतदारसंघांची पुनर्रचना’ होईपर्यंत रोखून धरण्याचे कारण काय? भाजपचा हा सत्ता कायम हातात ठेवण्यासाठी रचलेला एक कुटिल डाव होता जो विरोधकांनी हाणून पाडला.
भाजपने जे विधेयक आणले होते त्यात अनुसूचित जाती, जमाती आणि विशेषतः OBC महिलांच्या आरक्षणाची काय तरतूद होती असा सवाल वडेट्टीवार यांनी विचारला. ३३ टक्के आरक्षण देताना बहुजन समाजातील महिलांचा हक्क डावलून केवळ आपल्या मर्जीतील लोकांना सत्तेत बसवण्याचे हे षडयंत्र असल्याचे त्यांनी सांगितले. मनुस्मृती विचार मानणारी भाजप महिलांना केवळ दुय्यम स्थान देते. संघाच्या प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देतील का? असा सवाल वडेट्टीवार यांनी भाजपला विचारला.देशाचा नकाशा बदलून संविधानावर हल्ला करण्याचा भाजपचा कट होता,तो असफल ठरला अस वडेट्टीवार म्हणाले.
अमरावती येथील घटनेवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना वडेट्टीवार यांनी नवनीत राणा आणि खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर टीका केली. महिला अत्याचार आणि शोषणाच्या घटनेत जात-धर्म शोधणे घृणास्पद आहे. दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या नवनीत राणा आणि डॉक्टरी पेशाला काळिमा फासणारे वक्तव्य करणाऱ्या डॉ. बोंडे यांच्यावर तातडीने गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
देशातील रेल्वे, एअरपोर्ट, वीज प्रकल्प, सिमेंट आणि स्टील उद्योग हे सर्व नियम धाब्यावर बसवून अदानींच्या घशात घातले जात आहेत. देशातील जनता गरीब होत आहे आणि अदानी श्रीमंत होत आहेत. भाजप आणि अदानी एकमेकांना पूरक असून ते देशाला लुटत आहेत,असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
भाजप पुरस्कृत भोंदू बाबा आणि धर्मांध शक्ती देशात तेढ निर्माण करत असून, महिलांच्या नावाखाली आपली सत्ता वाचवण्याचे भाजपचे हे प्रयत्न देशातील जागरूक महिलांना नक्कीच समजतील, असा विश्वास विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
















