*शिक्षण म्हणजेच भविष्य हे जगातलं सर्वात महत्त्वाचं सूत्र*
*–ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर*
मुंबई
शिक्षण म्हणजेच भविष्य ( e=f) हे सूत्र न्यूटन आणि आईन्स्टाईनने मांडलेल्या नियमांच्या सूत्रापेक्षा सुद्धा महत्त्वाचे आहे, आणि आज मी जो काही आहे तो या सूत्राचे जिवंत उदाहरण आहे, अशा शब्दात ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर यांनी आपले विचार मांडले. माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांनी उच्च आणि दर्जेदार शिक्षणाचं महत्व ओळखून अशा संस्थांचे जाळे देशात उभारले, असे सांगून माशेलकर यांनी मनमोहन सिंग यांना आदरांजली देखील वाहिली.
ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतील “माझा ( डॉक्टरेट) पुरस्कार” डॉ. माशेलकर यांना शिवाजी मंदिर येथील एका हृद्य समारंभात निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी डॉ. माशेलकर बोलत होते.
यावेळी शिवाजी मंदिरमध्ये भरगच्च गर्दी केलेल्या मुंबईकरांनी उभे राहून डॉ माशेलकर यांना टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले.
आपल्याला ५१ डॉक्टरेट पदव्या मिळाल्या आहेत पण आज मुळ्येकाका विद्यापीठाची ही ५२ वी डॉक्टरेट मला खूप महत्त्वाची वाटते असंही त्यांनी विनम्रपणे सांगितलं.
आपल्या संपूर्ण जीवनात केवळ तिसरी उत्तीर्ण झालेल्या आईची प्रेरणा आपल्या पाठीशी होती हे सांगताना, डॉ माशेलकर यांनी मुंबईमध्ये किती प्रतिकूल आणि हलाखीच्या परिस्थितीत आपलं शिक्षण पूर्ण केलं ते सांगितलं. तत्कालीन राष्ट्रपती के आर नारायणन यांच्या हस्ते रतन टाटा आणि आपल्याला पद्म पुरस्कार मिळाला, तो जीवनातला अत्युच्च क्षण होता हे सांगताना डॉ माशेलकर भावूक होऊन म्हणाले की, स्वतः के आर नारायणन यांनी सुद्धा अतिशय गरिबीत आपलं शिक्षण घेतलं, त्यांना देखील टाटा स्कॉलरशिपने मदत केली आणि मलाही टाटा स्कॉलरशिपमुळे उच्च शिक्षण घेऊन जीवन घडवता आलं.
हळदीच्या पेटंटसाठी अमेरिकेच्या विरोधातली मोठी लढाई कशी जिंकली याविषयी सांगताना, हळदीचं महत्त्व आईनं कसं लहानपणापासून बिंबवलं होतं आणि त्यातून हा लढा कसा उभा राहिला याविषयी ते बोलले.
आपल्या पूर्वजांनी जीवनाच्या प्रयोगशाळेमध्ये वेगवेगळे प्रयोग करून जे ज्ञान मिळवले आहे त्या पारंपरिक ज्ञानाला देखील तितकंच महत्त्व आहे हे लक्षात घेऊन आपण पारंपरिक ज्ञानाचे डिजिटल वाचनालय विकसित केले आणि आज त्यात तीन कोटीपेक्षा जास्त संदर्भ आहेत. आज या संदर्भ वाचनालयाचा उपयोग जगातल्या सगळ्या पेटंट कार्यालयांना करावा लागतो असेही त्यांनी सांगितले.
गोरगरिबांसाठी विविध संशोधक आणि शास्त्रज्ञ जे काम करत आहेत त्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देऊन समाजाच्या उपकाराची परतफेड कर असे आपल्या आईने सांगितल्यामुळे, अंजनी माशेलकर फाउंडेशन स्थापन करून गरिबांसाठी उच्च दर्जाचे तंत्रज्ञान सहजपणे कसं उपलब्ध होईल हे या माध्यमातून पहात आहोत. हिमोग्लोबिनची स्तनाच्या कर्करोगाची, फुफ्फुसाच्या रोगांचे निदान अतिशय स्वस्त आणि अचूक पद्धतीने करणारे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रारंभी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी माशेलकर यांची ओळख करून दिली. एक शास्त्रज्ञ महात्मा गांधीजींची बांधिलकी मानतो ही खूप मोठी गोष्ट आहे असं ते म्हणाले. मुंबईकरांना डॉ मार्शलकरांना सलाम करायचा होता आणि मुळ्ये काकांची माणसांची निवड कधी चुकत नाही, असे सांगून सामाजिक भावनेतून सुरू असलेल्या अव्याहत कामाबद्दल अशोक मुळ्ये यांचा त्यांनी गौरवही केला.
यावेळी बोलताना अशोक मुळ्ये यांनी सांगितले की, “माझा पुरस्कारा” चे हे १८ वे वर्ष असून या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील निरपेक्ष वृत्तीने आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करतो. देशाला विज्ञानातूनच प्रगती साध्य होऊ शकते आणि त्यामुळे ५१ डॉक्टरेट पदव्या मिळवलेल्या आणि देशाचा बहुमान असलेल्या डॉ माशेलकर यांना मुंबईकरांतर्फे सन्मानित करण्याचा विचार आला असेही ते म्हणाले.
याप्रसंगी या सत्काराला जोडूनच सांस्कृतिक जल्लोष साजरा करण्यात आला . जयंत पिंगुळकर, नीलिमा गोखले, विघ्नेश जोशी, ओंकार प्रभूघाटे, श्रीरंग भावे, संपदा माने, केदार परुळेकर, सागर साठे
स्मृती तळपदे कला ग्रुप, आर्चीस लेले, विद्या करलगीकर या कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.



















