Home Uncategorized संकट काळात डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम केलं* –...

संकट काळात डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम केलं* – खा शरद पवार

146
0

*संकट काळात डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचं काम केलं*

खा शरद पवार

मुंबई दि.27 डिसेंबर

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं 26 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजून 51 मिनिटांनी त्यांचं निधन झालं. वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई येथे पत्रकारांशी संवाद साधताना दुःख व्यक्त केलं आहे.

शरद पवार बोलताना म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे. त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॉ. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते. भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल. ईश्वर डॉ. मनमोहन सिंह यांच्या आत्म्यास चीरशांती देवो, असे म्हणत शरद पवारांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

पुढे शरद पवार म्हणाले की, स्वातंत्र्याच्या नंतर अनेक वर्ष वेगवेगळ्या पद्धतीने देशाची सेवा करण्यासाठी डॉ. मनमोहन सिंग यांनी योगदान दिले. आज ते आपल्यात नाहीत आणि त्यामुळे होणारी अस्वस्थता वेगळी आहे. मनमोहन सिंग यांचा पिंड हा राजकारणी नव्हता. ते एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ होते, विचारवंत होते आणि सतत देशाचे उद्याचे भवितव्य घडविण्यासाठी काय करायची आवश्यकता आहे, याचा विचार करण्याची भूमिका घेत होते, अशीही शरद पवारांनी त्यांच्याविषयी भावना व्यक्त केली. यावेळी त्यांनी मनमोहन सिंग आणि त्यांचा परिचय कसा झाला? याची माहिती सुद्धा दिली आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा आणि शरद पवार  यांचा परिचय नेमका कसा झाला? याची माहिती देताना शरद पवार साहेब म्हणाले की, त्यांचा आणि माझा परिचय हा मुंबईत झाला होता. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून मुंबईत काम करत होते. त्यामुळे साहाजिकच कधी ना कधी, कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे आमचा सुसंवाद होत असे. त्यामुळे एक प्रकारे त्यांच्याबद्दलचे आकर्षण माझ्या मनामध्ये निर्माण झाले. नंतरच्या काळात चंद्रशेखर सिंह हे देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांच्या कार्यकाळात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांचे जे काही सहकारी होते. त्यांच्यामध्ये मनमोहन सिंग सुद्धा होते. त्यानंतरच्या काळात नरसिंहराव यांचे मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर मनमोहन सिंग यांच्याकडे अर्थखात्याची जबाबदारी देण्यात आली आणि मी तेव्हा संरक्षण मंत्री होतो असेही शरद पवारांनी सांगितले.

यावर सविस्तर बोलताना शरद पवार म्हणाले की , पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या ज्या एक दोन समित्या तयार करण्यात यायच्या, त्यामध्ये आम्ही दोघे सुद्धा होतो. त्यामुळे आम्हा सर्वांना त्यांचे विविध विषयातील निर्भीड विचार ऐकण्याची संधी मिळत असे. ते मितभाषी होते, पण आपल्या भूमिकेशी पक्के होते. देशाच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी त्यांच्याकडे आल्यानंतर त्या 10 वर्षामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला दिशा देण्याचे काम त्यांनी केले. आर्थिक संकटाच्या काळात देशाला सावरण्याचे काम त्यांनी नरसिंहराव पंतप्रधान असताना केले आणि स्वतः पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अधिक भरीव असे निर्णय घेऊन देशाला मोठ्या आर्थिक संकटातून बाहेर काढले. त्यांच्या 10 वर्षांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे असे 9-10 निर्णय त्यांनी घेतले आणि सबंध देशाला एका वेगळ्या दिशेला नेण्याचे काम त्यांनी केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा त्यांची मोठी प्रतिष्ठा होती, असे म्हणत शरद पवारांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here