Home Uncategorized *रुचिरा दिघे : एक हसतमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड !

*रुचिरा दिघे : एक हसतमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड !

15
0

*डॉ. मनोहर जोशी यांनी ते मुख्यमंत्री असतांना त्यांच्या स्वेच्छाधिकारातून मला एक छोटेखानी घर बोरीवली पूर्व येथे उपलब्ध करुन दिले. ९ मे १९९७ रोजी अक्षय तृतीयेच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक अशा मुहूर्तावर माझ्या मातोश्री मनोरमा वसंत त्रिवेदी आणि माझा परिवार अंबरनाथहून बोरीवली येथे वास्तव्यास आलो. बोरीवली येथे येण्याच्या आधी पासूनच माझ्या वडिलांचे जुने सहकारी आणि त्यानंतर पत्रकारितेत मी ज्यांच्याबरोबर १९७३ पासून कार्यरत आहे असे ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य आणि ज्येष्ठ क्रीडा संपादक अनिल माधव जोशी हे बोरीवली येथील निवासी परिचित असल्याने तशी अडचण नव्हती. दैनिक ‘सामना’मध्ये असल्याने माझे वरिष्ठ सहकारी संजय डहाळे हे तर सोबतच होते. इतकेच नव्हे तर संजय डहाळे आणि भारत कदम आणि मी आम्ही एकाच कुसुमभारती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या इमारतीत वास्तव्यास आहोत. नीलिमा जांगडा, नेहा पुरव, सत्यवान ताठरे, प्रमोद तेंडुलकर, रवींद्र राऊळ, दिलीप ठाकूर, विजय तारी, विनायक घोडे, प्रवीण वराडकर, दीपक भातुसे, प्रमोद डोईफोडे, कुनेश दवे, संदीप टक्के, राजू बांदेकर असे अनेक पत्रकार मित्र सोबतीला होतेच. राजेश पुरंदरे, राजन कोकाटे आणि मी असे तिघेही एकाच दिवशी रहायला आलो. माझा कुटुंब कबिला वाढत गेला, विस्तारत गेला. जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला, मागाठाणे मित्र मंडळ, उपनगरचा राजा यामध्ये मी विजय वैद्य यांच्या मुळेच कार्यरत राहिलो. शिवसेनेचे स्थानिक नेते विनोद घोसाळकर, विश्वनाथ नेरुरकर हेही मित्रांच्या मांदियाळीत होते. त्यामुळे ओघानेच बोरीवली येथे पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रात अहमहमिकेने भाग घेऊ लागलो. आमच्याच इमारतीत एअर इंडियाच्या अधिकारी पल्लवी शैलेश समेळ या रहात होत्या. पल्लवी शैलेश यांची सुकन्या सारा हिचा लहानपणापासून माझी पत्नी माया हीच सांभाळ करीत असल्याने पल्लवीच्या परिवारासोबत कौटुंबिक संबंध निर्माण झाले. पल्लवीचे वडिल तात्यासाहेब पिंपळे आणि मातोश्री मैना आज्जी यांचाही संबंध आला. तात्यासाहेब हे बोरीवली पूर्व येथील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष होते. माझ्या मातोश्री मनोरमा वसंत त्रिवेदी यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर दलितमित्र पुरस्कार राज्य सरकारने दिला होता. त्यामुळे तात्यासाहेब पिंपळे यांनी त्यांच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात माझ्या मातोश्रींचा सत्कार आयोजित केला. याच संघाच्या कार्यवाह होत्या. रुचिरा अशोक दिघे. हा साधारण पंधरा वर्षांपूर्वीचा प्रसंग. एक तर मनोरमा त्रिवेदी यांचा मुलगा आणि त्यात दैनिक सामना चा पत्रकार. त्यामुळे या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात तात्यासाहेब पिंपळे आणि रुचिरा दिघे यांचे मला नियमित बोलावणे असे. हळूहळू मी जरी सदस्य नसलो तरी ज्येष्ठ नागरिक संघाचाच एक घटक झालो होतो. विजय वैद्य यांनी ४४ वर्षांपूर्वी सुरु केलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला आणि बहुतेक कार्यक्रमांत आम्ही एकत्रच राहून कार्य करीत असू. मग उत्तर मुंबई पत्रकार संघाचाही त्यात हिरीरीने सहभाग. यामुळे रुचिरा दिघे यांचेही नियमित भेटणे. दिघे कुटुंब अतीशय मनमिळावू. अशोकराव आणि रुचिरा दिघे यांचे भेटणे ही नेहमीचीच बाब. मग कधी महाराष्ट्र बॅंकेत, ज्येष्ठ नागरिक संघात अशा गाठीभेटी व्हायच्या. मी तसा लहानच. पण मला प्रमुख वक्ता म्हणून तात्यासाहेब पिंपळे आणि रुचिरा दिघे यांनी सातत्याने बोलावले. विजय वैद्य यांना तत्कालीन दोन राज्यपालांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामुळे विजय वैद्य आणि वैशाली विजय वैद्य यांचा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला. या विविध कार्यक्रमांमुळे ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या ओळखी होऊ लागल्या. फार पूर्वी शानबाग नावाचे पदाधिकारी होते. तिथपासून विजय कुवळेकर, स्मिता चितळे, रविंद्र रानडे, गजानन बर्वे, चंद्रशेखर ठाकूर असे अनेक जण मित्र मैत्रिणींच्या मांदियाळीत सामील झाले. रुचिरा दिघे यांच्याशी सातत्याने होत असलेल्या संपर्कामुळे ज्येष्ठ नागरिक संघासाठी रेखा बोऱ्हाडे, मीना इंगळे यांची व्याख्याने आयोजित होऊ शकली. इतकेच नव्हे तर पुण्याहून ज्येष्ठ अभिनेते रविंद्र देवधर यांनी त्यांचे ‘मी भारतीय’ हा दीर्घांक सुद्धा रुचिरा दिघे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सादर करण्यात आले. रुचिरा दिघे यांचे पती अशोकराव यांचे काही काळापुर्वी देहावसान झाले. अशोकराव हे ज्योतीषशास्त्राचे गाढे अभ्यासक होते तसेच मुंबई महापालिकेत एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर म्हणून त्यांनी सेवा बजावली होती. मैना आज्जींनी काही वर्षांपूर्वी इहलोकीची यात्रा संपविली. २९ तारखेला ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यक्रमात डॉ. मीना वैशंपायन (माझे अहो भाग्य की आम्ही एकाच इमारतीत वास्तव्यास आहोत) यांचा त्यांनी लिहिलेल्या एकवीसाव्या ‘अनवट अक्षरवाटा’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने सत्कार करण्यात आला. या समारंभात मी आणि माया उपस्थित होतो. तात्यासाहेब तेंव्हा सहज बोलून गेले, “योगेश, घरातला एक खांब निखळला ना की काही खरं नाही बघ. कारण साधारण पंधरा दिवसांपूर्वी तात्या एका ठिकाणी पडले. थोडीशी दुखापत झाली. अहो, ९२ वर्षांचे तात्या, पण उंचेपुरे ठणठणीत राजबिंडे व्यक्तिमत्त्व असलेले. पण तेही हळवेच होणार नां. रुचिरा दिघे या ८५ च्या घरात. काही दिवसांपासून त्या आजारी. तरीही समाजमाध्यमात सक्रीय. माझ्याशी नेहमीच संपर्कात. त्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या एकदा कार्यवाह, उपाध्यक्ष आणि तीन वेळा अध्यक्षा. परंतु आजारी असल्याने त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील ही शक्यता कमी. म्हणून मी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दुसऱ्या दिवशी एअर इंडियाच्या निवृत्त अधिकारी मीना इंगळे नाईक यांच्या बरोबर गप्पा मारतांना रुचिरा दिघे यांचा विषय निघाला. आपण त्यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस करु, असं ठरवलं खरं. पण थोड्याच वेळात ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यवाह स्मीता चितळे यांचा संदेश आला की रुचिरा दिघे यांनी इहलोकीची यात्रा संपविली. मनात एकदम धस्स झालं. मीनाताईंशी बोलणे झाले. आणि शुक्रवारी तातडीने अंतीम दर्शन घेण्यासाठी गेलो. अगदी शांत झोपलेल्या वाटत होत्या. चेहरा हसतमुख. वाटलं आत्ता उठतील आणि म्हणतील, “या त्रिवेदी साहेब, कशी झाली आपली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला ? फारच छान कार्यक्रम ठेवले होते हो तुम्ही लोकांनी. पण माझं बघा ना, मी अशी आजारी. इच्छा असूनही येऊ शकले नाही. पण तुमच्या वसंत व्याख्यानमालेच्या बातम्या वाचल्या.” गेल्याच वर्षी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात रुचिरा दिघे यांनी आजवर केलेल्या कामाची पावती म्हणून त्यांना प्रेरणा पुरस्कार मा. खा. गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. प्रा. नयना रेगे यांनी अतीशय छानपैकी समर्पक असे बनविलेले मानपत्र त्यांना प्रदान करण्यात आले, ज्याचे वाचन जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेचे संयोजक सचिन वगळ यांनी आपल्या जबरदस्त शैलीत आणि खड्या आवाजात केले होते. या त्यांच्या पुरस्कार प्रदान सोहळ्याला दिघे कुटुंबिय आवर्जून उपस्थित होते. ‌रुचिरा दिघे या पती अशोकरावांप्रमाणेच उच्च विद्या विभूषित. त्यांनी अकौंटंट जनरल म्हणून सेवा बजावली. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात हिरीरीने भाग घेतला. मित्र मैत्रिणी जोडण्याची आवड. चांगले ऐकायला आवडते म्हणून जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेशी जोडले गेल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. हसतमुख आणि मनमिळावू व्यक्तिमत्वाच्या रुचिराताई म्हणूनच सर्वांना हव्या हव्याशा वाटत असतांनाच देवाने त्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या तमाम पदाधिकारी सदस्यांनी भगवान श्रीकृष्ण यांच्या श्रीमद्भगवद्गीता मधील पंधरावा अध्याय तसेच महामृत्युंजय मंत्र आणि स्तोत्रांनी साश्रुनयनांनी रुचिराताईंना निरोप दिला. एक हसतमुख व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेले. पण विजय वैद्य यांच्या प्रमाणेच रुचिराताईंचाही आत्मा आपल्या सभोवताली राहणार हे निःसंशय !*
*-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१. (लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here