कोल्हापूर दि. १८ ऑक्टोबर : “ग्रामीण महिलांकडे श्रम व कौशल्यावर आधारित पारंपरिक ज्ञान आहे त्याची दखल घेतली पाहिजे.” असे मत जेष्ठ स्त्रीवादी अभ्यासक, लेखिका व पत्रकार संध्या नरे -पवार यांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या इतिहास विषयांतर्गत जागतिक ग्रामीण महिलादिना निमित्ताने आयोजित ऑनलाईन व्याख्यानात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संचालक डॉ.कृष्णा पाटील होते. यावेळी उपकुलसचिव विनय शिंदे, रुकडी येथील श्री.शाहू छत्रपती ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रा.डॉ.राम चट्टे ,प्रा.कांचन खराटे, समन्वयक डॉ. चांगदेव बंडगर, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.
संध्या नरे-पवार म्हणाल्या की, “ग्रामीण महिलांनी शेतीचा, बी-बियांणाचा शोध लावला. त्या उत्तम शेती करतात. त्यांना वैद्यकीय ज्ञान मोठ्या प्रमाणात असते. त्याच बरोबर पशु वैद्यकीय ज्ञानसुद्धा त्यांना असते. कुटुंबातील मनुष्य व प्राणी यांच्यावर करता येणाऱ्या घरगुती उपचार व स्थानीय पातळीवर मिळणाऱ्याऔषधी वनस्पती यांचे ज्ञान स्त्रियांना असते. विणकाम बाबतचे महिलांचे ज्ञान वैविध्यपूर्ण व महत्त्वाचे आहे. बलुतेदार व्यवस्थेत स्त्रियांचे कौशल्य महत्त्वाचे होते. बांबूच्या वस्तू बनविणे, दुधापासून अनेक प्रकारची उत्पादने निर्माण करणे तसेच मासेमारी करणे, मासे टिकवणे आणि त्याची विक्रीचे व्यवस्थापन पाहणे यासारख्या पारंपरिक ज्ञानाला गृहीत धरल्याने त्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यांच्या ज्ञानाला व श्रमाला मूल्य आणि महत्त्व दिले जात नाही. ग्रामीण स्त्रियांच्या या पारंपारिक ज्ञानाची दखल घेणे हे त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.
आजची शेती यांत्रिकीकारणामुळे संकटात आली. शेती वाचवायची असेल आणि शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी म्हणून स्त्रियांना ओळख मिळाली पाहिजे. ज्ञान, कौशल्य आणि व्यवस्थापनाचे धडे स्त्रियांकडून घेतले पाहिजे. घरातील पारंपरिक ज्ञान जतन करुन ठेवण्याची जबाबदारी वाढलेली आहे. शिक्षणापासून स्त्रियांना वंचित ठेवता कामा नये. शिक्षण आणि स्त्रियांच्या पारंपरिक ज्ञानाची सांगड घातली पाहिजे. त्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. स्त्रियांचे ज्ञान हे कौशल्यावर आधारित आहे. त्याचे आपण मूल्य केले पाहिजे. त्यांच्या ज्ञानाचे संरक्षण ग्रामपंचायत ते सरकार या पातळीवर केले पाहिजे.” असे संध्या नरे- पवार यांनी सांगितले.
डॉ.कृष्णा पाटील अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, “ग्रामीण स्त्रीकडे असलेले ज्ञान केवळ परंपरा नसून ते एक सर्जनशील,श्रमशील आणि सांस्कृतिक शहाणीव आहे. ग्रामीण महिलांचे पारंपरिक ज्ञान आजच्या काळात उपयोगात आणणे महत्त्वाचे आहे. ग्रामीण महिलांच्या पारंपरिक ज्ञानातील माहिती, कौशल्य व व्यवस्थापन विचारात घेणे आवश्यक आहे.”
यावेळी स्वागत व प्रास्ताविक डॉ. मुफिद मुजावर यांनी केले तर आभार बबन पाटोळे यांनी केले.
Home सातारा / सांगली / सोलापूर / कोल्हापूर ग्रामीण महिलांच्या पारंपरिक ज्ञानाची दखल घेतली पाहिजे – जेष्ठ स्त्रीवादी अभ्यासक संध्या...
























