पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्यापासून नवे जीएसटी दर लागू होणार असल्याची घोषणा केली आहे. या बदलामुळे घर, कार, टीव्ही, फ्रिजसह अनेक वस्तू स्वस्त होणार असून सामान्य नागरिक, व्यापारी आणि मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळणार आहे.
*पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा*
उद्यापासून देशात “जीएसटी बचत उत्सव” सुरू
देशात २२ सप्टेंबरपासून लागू होणार नवे जीएसटी दर.
घर, टीव्ही, फ्रीज, कार यांसह अनेक वस्तू स्वस्त होणार.
गरीब, मध्यमवर्गीय, व्यापारी, तरुण वर्गाला याचा मोठा फायदा होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी आज देशातील मोठ्या वर्गाला दिलासा दिला. देशात उद्या सकाळपासून जीएसटीचे नवे दर लागू होणार असल्याचा निर्णय सांगितला. या निर्णयामुळे व्यापारी, तरुणांना याचा मोठा फायदा होणार आहे. आवडत्या वस्तू कमी दरात खरेदी करता येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच घर, फ्रिज, कार स्वस्त होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं .
उद्या पासून लागू होणाऱ्या जीएसटी बदलावर पंतप्रधान मोदी म्हणाले, ” २२ सप्टेंबर रोजी जीएसटीचे नवे बदल लागू होणार आहे. उद्यापासून देशात जीएसटी बचत उत्सव सुरू होत आहे. या जीएसटी बचत उत्सवात तुमची बचत होणार आहे. तुम्ही आवडीच्या गोष्टी स्वस्तात खरेदी कराल. देशाचे गरीब, मध्यमवर्गीय, युवा, किसान, महिला, व्यापारी, दुकानदारांना सर्वांना याचा फायदा होणार आहे. म्हणजेच, उत्सावात सर्वांचे तोंड गोड होणार आहे. देशाच्या प्रत्येक कुटुंबाचा आनंद वाढणार आहे.”
जीएसटी लागू केल्यामुळे नागरिकांना हव्या असलेल्या वस्तू स्वस्तात मिळणार असल्याच्या मुद्द्यावर मोदी म्हणाले ” मागील ११ वर्षात देशात २५ कोटी लोकांनी गरिबीला हरवलं आहे. मोठ्या प्रमाणात लोक गरिबीतून बाहेर येत मध्यमवर्गात आला आहे. या वर्षी सरकारने १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करत भेट दिली. १२ लाख रूपयांचे उत्पन्न कर मुक्त केल्यानंतर मध्यमवर्गींच्या जिवनात मोठा बदल झाला. आता गरीब, मिडल क्लास यांना नव्या जीएसटीमुळे फायदा होणार आहे. जीएसटी कमी झाल्यामुळे देशातील नागरिकांना स्वप्न पूर्ण करणं अधिक सोपं होणार आहे. घर, टीव्ही, फ्रीज, स्कूटर, बाईक, कार खरेदी करणं आता अधिक स्वस्त होणार आहे. तसेच हॉटेल्स आणि तुमचं फिरणही स्वस्त झालं आहे “