‘चांगभलं’- *द ग्लोबल टाईम्स* दि.१०-८-२०२५
*प्रस्तावना*
*काल ९ऑगस्ट क्रांतिदिन! १९४२ ला महात्मा गांधींनी देशातल्या जुुलमी ब्रिटीश सत्तेला ‘चले जाव’ चा नारा देत इशारा दिला . भारतीय स्वातंत्र्य* लढ्यातील, ऑगस्ट क्रांती दिन हे एक सोनेरी पर्व ! आणि सोबत रक्षाबंधनाचा दिवस* ! ..असा सुंदर योग जुळून आला होता. आसपास जे एकूण राजकीय व सामाजिक वातावरण आहे ते पहाता समाजातील, राजकारणातील दुष्ट व घातक प्रवृत्तींना’ चलेजाव’ म्हणण्याची वेळ आलीय हे नक्की!*त्यासाठी स्वातंत्र्य,समता, सर्वांसाठी संवेदनशीलता खूप गरजेची आहे.*
*स्वातंत्र्य प्रथम की समाजसुधारणा प्रथम हा त्यावेळचा लोकमान्य टिळक विरुध्द ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकर यांच्यातील वैचारिक वादाच्या रेषा ‘या योगावर’ मनात गडदपणे उमटल्या.*
‘स्वातंत्र्य तर मिळणार आहेच पण आपला समाज सुधारायला हवा.’ हे आगरकरांचे मत !
‘केसरी’चे १ले संपादक व ‘सुधारक’ साप्ताहिकातून पुरोगामी सुधारणावादी विचाराने प्रहार करणारे आगरकर टिळकांइतकेच प्रखर विचारवंत!
इंग्रजांच्या “संमतीवयाच्या कायद्या’ला (मुलीचे लग्नाचे वय १०वरुन १२ वर्षे करण्याला) टिळकांचा विरोध,तर आगरकरांचा पाठिंबा होता. समाजातील चुकीच्या बाद झालेल्या परंपरा रुढी बंद झाल्या पाहिजेत, क्रांतिकारी विचार, आणि समाजप्रबोधनातील ‘पुरोगामी’ आगरकर यांचे विचार आजही तितकेच आवश्यक वाटतात. *महाराष्ट्रातील नेते स्वतःला पुरोगामी म्हणवतात ते असे अनमोल योगदान देणाऱ्या ‘सुधारकां’ मुळेच!*
● *स्वातंत्र्य ! माया -ममत्व ! आदरभाव .. याचं वेळी रक्षण अपेक्षित!*
आपल्या महाराष्ट्रात रक्षाबंधन सण अलीकडील काही वर्षात मोठा झाला. आपल्याकडे भाऊबीज हा सण महत्त्वाचा ! भावाकडून आजच्या काळात फक्त आपुलकीची अपेक्षा,समाजाकडून स्त्री सन्मान व उचित आदराची गरज अपेक्षित आहे!
उलट कायदे असुनही पद, पैसा, प्रतिष्ठा या दावणीभोवती लिंगभेद घुटमळतोय. कुठलेतरी अश्लील चित्रण हनिट्रॅप, बाँब बनतो…
राजकीय मारामारीत ‘स्त्री’ चा उपयोग विचित्र पध्दतीने होतोय. हे तर पूर्वापार चालत आलेले ‘विकृत आजार’ आहेत. जोवर ही मानसिकता बदलत नाहीत तोवर सुधारणा होणार नाही.
‘जात -धर्म’ यापलीकडे जायचं म्हटलं तरी स्वार्थात अडकलेली मूळं नव्याने रुजताना फोफावताना दिसतात.
‘जात नाही ती जात’ नाही तर ‘खोट्या अंहकारासाठी माती खाते ती जात’ असंच म्हणावं लागेल. दुसरीकडे धर्माच्या नावावर वर्तमान वास्तवाचे भान न ठेवता होणारा आक्रस्ताळेपणा दिसतो.
● *पुन्हा गुलामीच्या दिशेने… ‘खोटा पैसा’ नि ‘खुर्ची’ घात करतेय!*
*भारतीय जनतेला स्वातंत्र्य सर्व प्रकारच्या पातळीवर लढून मिळालं. या लढाईत सर्वधर्म आणि जाती यांचे योगदान होते पण, इंग्रज जाताना दुहीची बिजं रोवून गेले,त्यांचं अजुनही समुळ उच्चाटन होत नाही.*
*’गुलाम आणि मालक’ या जोखडातून बाहेर पडू पहाणारे आपण पुन्हा त्याच दिशेने धावत आहोत!*
*श्रमिक,कष्टकऱ्यांच्या हिताचे कायदे बदलून मालक धार्जिणे केले गेले. तरुणांना सहज रोजगार मिळत नाहीत. सरकारी योजना नियोजन कितीही असो पण कामाची रचनाच बदलून टाकली कायद्याने..* *लोकशाहीत मोठ्या संख्येने असलेल्या युवाशक्तीचा विचार होणे आवश्यक पण, ते होण्यास नियोजन असले तरी अंमलबजावणीत कमी आहोत.याकडे लक्ष देऊन सुधारणा होणे आवश्यक आहे.*
*स्वैराचार, राजसत्तेवर धर्म वर्चस्व ,जनहिताची जबाबदारी विसरुन जेव्हा मदांध होऊन कृती होते तेव्हा देश व राज्य यांचा कणा कमकुवत होतो.*
*साधुसंत ‘येती घरा तिची दिवाळी दसरा’,ही उक्ती अचुक आहे.पण साधुसंत कसे ओळखावे?* सत्ता पैसा यांच्यापासून अलिप्त असणारे ..ते खरे साधू! देव सर्वत्र पहाणारे ते संत!*
*संतपद कुणी पुरस्कारात वा सोहळ्यात देण्याची गोष्ट नाही. ती कृतीतून सिद्ध होते..लोकशाही चुकीच्या दिशेने जाता कामा नये ..यावर चिंतन होणे आवश्यक!*
● *’बहिणीला मदत’ हे टीकाजाल बनू नये!*
भावासोबत अतुट बंधनाचा दिवस म्हणून सरकारने खर्या गरजू लाडक्या बहिणींच खात्यात पैसे जमा केले असतील. ना आदिती ताईंनी तसा शब्द दिला होता. सरकारातल्या ‘त्रिदेव भावांची ‘ हमी होती. ज्यांनी पैसे लाटलेत,त्यांच्याकडून वसूल व्हावेत. चुका दुरुस्त व्हाव्यात. विरोधकांनी या योजनेवर सारखी टीका करु नये ही अपेक्षा प्रत्येक गरीब बहिण करते आहे.* *बस्स करा ! ती टीका आणि सुधारणेसाठी बोला..कृती करा. म्हणजे चुका सुधारतील !*
● *अंमलबजावणी वर लक्ष कोण ठेवणार ?*
*जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा…छान वाटतं ऐकताना शब्द उच्चारताना ,प्रत्येक महाराष्ट्रीयाचं उर अभिमानाने भरुन येतं! येत न?*
*मला शंका आहे किंचित!आपल्या महाराष्ट्राची ‘राजभाषा मराठी’ ‘व्यवहार उदिमाची भाषा’ व्हावी हे लक्ष्य असायलाच हवे .. आहे ..आणि ते लक्ष्य पुर्णही व्हावं!* *पण इथेही सरकारी आदेश न मानणारे आहेत. त्यांना पाठिशी घालणारे भ्रष्ट अधिकारी नि सत्ताकारणी आहेत.
*शिक्षण विभागाचंच उदाहरण देता येईल!*
*भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीचं काम त्यांच्याच विभागातील लोक नेमून केली जाते. काय समोर येणार?..एका विषयात एस आय टी नेमलीय! अनेक वर्षांपासून चा एक प्रचंड मोठा घोटाळा समोर आलाय. शिक्षक म्हणून नोकरी करताना बिएड ची परिक्षा देण्याचा! ..काय काय नाही याच्यात? काय दिवे लावणार असे शिक्षक? कशी घडणार पुढची पिढी?*
*काही पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते हा विषय लावून धरतात…पण खूप वेळ निघून गेल्यावर विषय थंड होतो. समाज सतत सक्रिय हवा.व्यक्त होत रहावा..हे महत्वाचं!*
. ● *एक आनंदाची गोष्ट घडली ती म्हणजे, सर्व शाळांमधे राष्ट्रगीताबरोबर आपलं महाराष्ट्र राज्यगीत म्हणणे आवश्यक असल्याचा जि आर निघाला.*
*आता हा जि आर नेमाने पालन केला जातो का हे कोण पहाणार? त्यासाठी तक्रार नंबर आहे का? या विषयाबद्दल नाही तर शालेय शिक्षण , उच्च शिक्षण विषयात तक्रारीची दखल किती व कशी घेतली जाते हा संशोधनाचा विषय आहे.हे नमुद करण्याचे कारण खूप महत्त्वाचे आहे… ते पुढे वाचा.*
● *महाराष्ट्र सरकारचा आदेश न जुमानणारे हे कोण मुजोर?*
*आदल्या दिवशी रात्री उशीरा सरकारने नारळी पौर्णिमा व गौरीविसर्जन सुट्टी जाहीर केली, आदेश निघाला. …आनंद वाटला.पण सगळं सुरळीत होणार नाही ही खात्री होती.*
* ICSEबोर्डाच्या मुंबईतील काही शाळा शुक्रवारी सुरु रहाणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती मिळाली.मी ट्विट केलं.शिक्षण मंत्री ना दादा भुसे यांच्या ‘पवार’ या सचिवांना मेसेज केला, संपर्क करुन माहिती दिली… एकदम थंड प्रतिसाद दिला त्यांनी!* कदाचित त्यांना याची कल्पना असावी !
*त्यामुळेच काही बदल घडेल असं वाटलं नाही !* *महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या आदेशाला धुडकावून रक्षाबंधनाच्या दिवशीICSE बोर्डाच्या ●ज़मनाबाई नरसी स्कूल जुहू ● चतुर्भुज स्कूल -इरला पोद्दार स्कूल -सांताक्रुज पश्चिम ●आर्या विद्या मंदिर -जुहू ● माणेकजी कूपर स्कूल – जुहू तारा रोड जुहू या शाळा सुरु ठेवल्या गेल्या* इतरही असतील. याचा शोध फक्त सरकारचं काम नाही .आपलंही काम आहे.
*या शाळा महाराष्ट्रात सगळे फायदे घेतात,मात्र महाराष्ट्राचे नियम आदेश पालन करत नाहीत. इथे शिकणारे विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी महाराष्ट्रातील नाहीत काय? संस्थाचालकांकडे इतकी मस्ती येते कुठून? सगळी शाळा काॅलेज परिक्षा बंद ,मग हेच कोण टिकोजी राव? महाराष्ट्रात शाळा चालवायची तर नियम निर्देश पाळणार की नाही? या सगळ्यामागे भ्रष्ट अधिकारी नि विचित्र राजकीय शक्ती काम करतात का हे शोधण्याची वेळ आलीय… मजाक करुन ठेवलाय प्रशासकीय कामाचा!*
(शिक्षणाधिकारी,सचिव,उपसचिव, आंधळी कोशिंबीर खेळतात?)
● *माणूस सुखानं निरोगी जगणं आवश्यक !*
*धर्म भावना आणि त्याचे सोपस्कार घरी असावेत. त्यासाठी आपली प्रार्थना स्थळं आहेत!*
*पण जेव्हा सेवाभाव आणि आम्ही करतो म्हणतो ते योग्य म्हणत समाज झुंडशाही करतो ,तेव्हा त्याला राजकीय इच्छाशक्तीच बळ असतं हे निश्चित!*
*दादरच्या ‘कबुतरखान्या’चा विषय असाच! कबुतर हे कुणाचेही दुष्मन नाहीत,पण त्यामुळे होणारे आजार घातक! जैन समाज यासाठी इतका आक्रमक होणे.समाजकार्यात, चॅनल्स वर शाब्दिक लढाया होणे ,याची गरज काय?*
*इथे मुंबईत अनेक जागांवर ,मनोरंजन स्थळांवर कुणी नियोजनबध्द अतिक्रमण केलेय हे जगजाहीर आहे. पण इथेही पैसा आणि खुर्ची काम करते.* *जैनांनी कबुतरांना आपल्या मंदिरांत किंवा इतरत्र एक जागा करुन तिथे खान- पान सेवा दिल्यास पुण्यकर्म होणार आहे. इतकं समजलं तरी खूप आहे.*
*पण विषयाचं राजकारण करणार नाही ते राजकारणीच नाहीत!*
*फक्त विषयाचा जाळ पेटवायचा..चर्चेत रहायचं की मुळ विषय बाजूला रहातो..हे सध्याचं गणित!*
*गरज आहे ती जनहिकारी निर्णय घेऊन कामाचा वेळ व पैसा न दवडता कृती करण्याची…सरकार जागं रहा आणि जनहित वेळीच साधा.* *शिक्षण,आरोग्य,सांस्कृतिक, महिला बाल हित,उद्योग, नगरविकास कृषी,कामगार सगळेच महत्त्वपूर्ण!सर्वांना वेळेत आधार व मदत द्या!* *यातच सर्वांचं ‘चांगभलं’ आहे!*नाहीतर नुसताच राळ आणि धुरळा… हाती खुळखुळा!* *****

























